Rahul Narwekar on MLA Disqualification Case Verdict: मुंबई : आज महाराष्ट्राच्या राजाकारणातील ऐतिहासिक दिवस असून संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींकडे लागलं आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय जाहीर करणार आहेत. अशातच निकालापूर्वी माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली. निकालात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले. संविधानात ज्या लिखित तरतूदी आहेत, त्या सर्व तरतूदींना अनुसरुनच हा निर्णय असेल, असंही ते म्हणाले आहेत. तसेच, हा निर्णय देताना कायद्याचं पालन होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले की, "आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज दिला जाईल. हा निकाल निश्चितपणे कायद्याला धरून असेल, संविधानाच्या तरतूदी आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानं ज्या काही सूचना केलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवून निर्णय दिला जाईल, या निर्णयातून सगळ्यांना न्याय मिळेल." तसेच, या निर्णयातून दहाव्या सूचीतल्या काही बाबी आतापर्यंत स्पष्ट झालेल्या नव्हत्या, त्यातून हा निश्चितपणे अत्यंत मुलभूत आणि बेंचमार्क असा निर्णय असेल आणि या निर्णयातून कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. 


"काही विशेष घटना घडल्या आहेत, ज्याचा उलगडा आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत झालेला नाही. मात्र, या प्रकरणात अर्थ लावण्याची गरज होती. कायद्यातील सर्व तरतुदींचा विचार करूनच योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. निश्चितच या देशासाठी एक रक्षण करणारा निर्णय 10 सूचीनुसार घेतला जाईल.", असं राहुल नार्वेकर म्हणाले. 


राऊतांना स्वस्त पब्लिसिटी हवीय, त्यांच्यासारख्यांना बेस्ट इग्नोर : राहुल नार्वेकर 


संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्षांनी दिल्लीहून निर्णय आणला अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. याबाबत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, "ते उद्या म्हणतील लंडनहून निर्णय आणलाय, अमेरिकेहून आणलाय, त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का? उगाच त्यांना उत्तर देऊन, उगीच त्यांनाही स्वस्त पब्लिसिटी हवी आहे, त्यात वाव देण्यासारखं नाही. त्यामुळे संजय राऊतांसारख्यांना लोकांना बेस्ट इग्नोर." 


"मी तुम्हाला सांगितलं आहे की, जी व्यक्ती माजी मुख्यमंत्री झाली आहे, विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्यांना काय काम करावे लागेल, मुख्यमंत्र्यांनी आणि विधानसभा अध्यक्षांची पंधरा दिवसात भेट होते. कदाचित त्यांना या विषयाची माहिती असावी, पण ते स्वत: मुख्यमंत्री असल्यानं कदाचित त्यांना या विषयाची फारशी माहिती घ्यायला वेळ मिळाला नसावा, त्यामुळे आणखी काय सांगू? ते?", अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. 


पाहा व्हिडीओ : Rahul Narwekar On MLA Disqualification : कायद्याला धरुन निर्णय दिला जाईल, सगळ्यांना न्याय मिळेल