मुंबई: माझ्यासोबत असणाऱ्या 50 आमदारांच्या विश्वासामुळे आजचा दिवस उगवला असून तो अनपेक्षित असा आहे असं राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाचा फायदा या सरकारला होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझाशी बोलत होते. 


मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "एवढ्या वेगाने घडामोडी घडतील असं वाटलं नव्हतं, माझ्यासोबत जे काही 50 आमदार आहेत त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळे आजचा दिवस उगवला. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. सत्तेतून पायउतार होऊन आम्ही विरोधात गेलो हे ऐतिहासिक आहे. एक भूमिका घेऊन, बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्व आणि आनंद दिघे साहेबांचे विचार यामुळे हे शक्य झालं."


यापुढे सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि राज्य विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असं सांगत एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजपकडे 120 हून अधिक आमदार असतानाही त्यांनी बाळासाहेबांचा शिवसैनिक एकनाथ शिंदेला पाठिंबा दिला. हीदेखील एक ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. 


हा देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्टोक
संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि शिवसैनिकांला मुख्यमंत्री केलं. हा देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विधिमंडळात आमच्याकडे संख्याबळ अधिक असल्याने आम्ही शिवसेना म्हणून कार्यरत राहू असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


शपथविधी झाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, हा बाळासाहेबांच्या विचारांच्या आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या शिकवणीचा विजय आहे. राज्याचा विकास आणि महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम मी करणार आहे. सर्वांच्या साथीने विकासाचा गाडा नेण्यात येईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सोबत कायम आहे, त्यांच्या साथीने महाराष्ट्राचा विकास करू. 


आज राजभवनमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.