Eknath Shinde Maharashtra New CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा सुरु झाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आले होते, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरत सत्तास्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील अशी घोषणा करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. फडणवीसांच्या या खेळीला सोशल मीडियावर मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटले जातेय. यालाच अनुसरुन राष्ट्रवादीचे आमदार आमोल मिटकरी यांनी ट्वीट केलेय. फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे षडयंत्र? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केलाय.
अमोल मिटकरी यांनी एकामागोमाग दोन ट्विट करत भाजपावर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टरस्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल... असा टोला मिटकरी यांनी लगावलाय. तसेच अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ किती असणार याचा अंदाजही बांधलाय. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कारकिर्द कदाचित (30जुन 2022ते 11जुलै 2022)..देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक.. असं ट्विट मिटकरी यांनी केलेय...दरम्यान, सत्तेपायी हपापलेल्या स्वार्थी लोकांसाठी श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहून ठेवलं होतं. "सत्तेसाठी हपापावे l वाटेल तैसे पाप करावे l जनशक्तीस पायी तुडवावे l ऐसे चाले स्वार्थासाठीll" महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे टेंडर घेणारे आज सरकार स्थापन करत आहेत!सावधान !! असे ट्विटही मिटकरी यांनी केले होते.
एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. अनेकांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलेय.