ठाणे : मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाण्यातही शिवसेना-भाजप युतीचं घोंगडं भिजत आहे. मात्र युती होवो किंवा नाही, शिवसेनेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत.


ठाणे महानगरपालिकेसोबत उल्हासनगर महानगरपालिकेबाबतही चर्चा झाली. भाजपशी युती करण्याबाबत झालेल्या बैठकीला शिवसेनेचे ठाणे-उल्हासनगरमधील सर्व खासदार, आमदार, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीत सर्व नेत्यांनी अंतिम निर्णय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवला.

ठाणे-उल्हासनगरमध्ये युती झाली नाही, तरी आपली स्वबळावर लढण्याची तयारी आहे, असं स्थानिक नेत्यांनी शिंदेंना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सर्वा जागा लढवण्याबाबत शिवसेनेची चाचपणी पूर्ण झाल्याचं चित्र आहे. असं असलं तरीही एकनाथ शिंदे स्वतः युतीसाठी सकारात्मक आहेत.

सेना-भाजप युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या चर्चेनंतर ठाणे-उल्हासनगरमधील युतीबाबत काय निष्कर्ष निघतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.