मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यावर हा आदेश नसून केवळ याचिकाकर्त्यांना वाढवून दिलेला वेळ आहे, तसा कोणताही निर्णय घेऊ नका असं न्यायालयाने म्हटलं नाही असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. 


दीपक केसरकर म्हणाले की, "कोर्टात प्रकरण असताना त्यावर मत प्रदर्शन करणे, विपर्यस्त छापून येणे चुकीचे आहे. मीडिया ट्रायल्स होऊ नये. आज काही जणांकडून चुकीची बातमी चालवली जात आहे. वेळ वाढवून देण्यासाठी वेळ मागितली आहे. चिन्हासंदर्भात चुकीची माहिती दिली जात आहे. घटनातज्ज्ञ म्हणून चुकीचे मत प्रतिक्रिया देणे आणि निर्णय काय यात फरक आहे. निवडणूक आयोग संदर्भ याचिकाकर्त्यांनी केवळ वेळ मागितली आहे. शिवसेनेच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली, ती देण्यात आली.  चिन्हासंदर्भात काहीही निर्णय दिलेला नाही. ऑर्डर मी वाचून दाखवली, त्यात चिन्हाबाबत निर्णय घेऊ नका असं कुठेही म्हटलं नाही. वकील काय म्हणतात त्यापेक्षा ऑर्डर वाचा."


मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील, तेव्हाच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली ते म्हणाले की, "जनतेकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे कौतुक होत असून रोज हजारो लोक भेटायला येत आहेत. मुख्यमंत्री लोकांच्या कागदावर लिहित आहेत. आलेला अर्ज फक्त सरकवत नाहीत तर कार्यवाही करत आहेत ही सुखद भावना असते. त्याचे कुणाला वाईट वाटत असेल तर तो त्यांचा दोष आहे."


मला ज्या प्रमाणे वरिष्ठ सांगतात ती माहिती मी देतो. मी कुठलेही निर्णय घेत नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार चार दिवसांत होईल हे त्याच धर्तीवर सांगितले होते असं दीपक केसरकर म्हणाले. सीएम यांची जनरल ट्रीटमेंट सुरू आहे. त्यांची झोप कमी आहे. त्यामुळे तब्येतीची काळजी घेतली तर ते लोकांची सेवा करतील असंही ते म्हणाले. 


संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली त्यावर आम्ही बोलणार नाही. कस्टडी वाढवून दिली याचा अर्थ सूडबुद्धीने कारवाई होत नाही. एजन्सीला आपलं काम करू द्यावं, कोणीही मीडियासमोर येऊन स्टेटमेंट देऊ नये, त्यामुळे किरीट सोमय्याना विनंती करतो.