Kolhapur Crime  : शिरोळ तालुक्यातील चिंचवड येथील वृद्ध महिलेच्या खूनप्रकरणी कोल्हापूर शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ३३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. 30 जुलै रोजी चंपाबाई भूपाल काकडे यांचा गळा दाबून खून झाला होता. तसेच सोन्याचे मंगळसूत्र व कानातील सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला होता. पोलिसांनी शिताफीने या प्रकरणाचा तपास करताना आरोपीच्या 72 तासात मुसक्या आवळल्या. 


सदरचा गुन्हा अवघ्या 72 तासात उघडकीस आणल्यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तपास पथकाचे अभिनंदन करताना 10 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.  याप्रकरणी शिरोळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय गोर्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरोळजवळील नंदीवाले वसाहत येथे राहणारा आरोपी प्रकाश लक्ष्मण नंदीवाले याने महिलेच्या घरी जाऊन पिण्यासाठी पाणी मागितले होते.


ते पुढे म्हणाले की, पाणी पिल्यानंतर त्याने तिला ढकलले आणि कपड्याने तिचा गळा दाबला. त्यानंतर अंगावरील सोने घेऊन मोटारसायकलने पोबारा केला होता. आम्हाला घटनास्थळी एक टोपी सापडली. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तीच टोपी घातलेला एक माणूस घराजवळ येताना दिसला. आमच्या स्थानिक सूत्रांकडून आम्ही त्याची ओळख पटवली आणि बुधवारी तो शिरोळ येथे दुचाकी चालवत असताना आम्ही त्याला पकडले. 


आरोपीचा 72 तासात छडा, पोलिस अधीक्षकांकडून 10 हजार रुपयांचे बक्षीस 


सदरचा गुन्हा अवघ्या 72 तासात उघडकीस आणल्यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तपास पथकाचे अभिनंदन करताना 10 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. 


सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, जयश्री गायकवाड व उप विभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार यांचे अधिपत्याखाली पोलीस अमंलदार महेश खोत, सजंय इंगवले, अमर शिरढोणे,सुरज चव्हाण, आसिफ कलायगार, अनिल पास्ते, रणजीत कांबळे, नामदेव यादव व उत्तम सडोलीकर, रफिक आवळकर, राजेंद्र वरंडेकर व सायबर पो.ठाणे कडील सचिन बेंडकाळे यांनी मिळून केली.