जळगाव : एकनाथ खडसे यांच्या आमदारकीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांनी निर्णय घेतला तर एकनाथ खडसे आमदार होणार, असं सूचक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राज्यभरात दौरा करत आहेत. सध्या ते जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोतल होते.


"पाडळसरे धरण लवकर पूर्ण करावं असा प्रयत्न या सरकारचा असून त्यासाठी या धरणाच्या कामाचं नियोजन काय आहे. यासाठी धरणाला भेट दिली आहे. या धरणाच्या कामाला गती देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात अधिक तरतूद करणं, केंद्रीय मदतीची योजना त्यात बसवणं, हा आमचा प्रयत्न असणार असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाडळसे धरण आढावा बैठकीत बोलताना सांगितलं.


मराठवाड्याचे प्रश्न लगेच मार्गी लागतात मात्र खानदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. खानदेशात आपण कमी पडत आहात का? याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की, "नुकताच या भागाचा दौरा केला असून जळगाव, नंदुरबार, नाशिक या भागांतील प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. तसेच या भागांसाठी अधिक असा निधी उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून नियमित अर्थसंकल्पीय तरतूदींच्या पलिकडे जाऊन राज्यपालांच्या मर्यादेत अधिकचा निधी मिळवून प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न करु."


राज्यपालांना आज विमान प्रवास करण्यास नकार देण्यात आला होता. या विषयावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "राज्यपालांना विमान प्रवास का नाकारण्यात आला याबाबत आपल्याला माहीत नाही आणि तसं करण्याचं काही कारणंही वाटत नाही, मात्र काही तांत्रिक कारणावरून असं झालं असू शकेल." अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.


एकनाथ खडसे यांचा स्पर्श झालेले विकासाचे प्रकल्प भाजपने रखडवून ठेवले : जयंत पाटील


एकनाथ खडसे यांचा स्पर्श झालेले विकासाचे प्रकल्प भाजपने रखडवून ठेवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. "एकनाथ खडसे यांच्या हस्ते अमळनेर येथील पाडळसरे धरणाचे भूमीपूजन झाले होते. मात्र, हे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे खडसेंचा स्पर्श झाला ती कामे करायचीच नाही, अशी भाजपची भूमिका होती की, काय अशी शंका उत्पन्न होतेय." असं जयंत पाटील यांनी म्हटलं.


दरम्यान, जयंत पाटील गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 2019 च्या निवडणुकांदरम्यान या भागात प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा सत्तेत आलो, तर पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं. महाविकास आघाडीची सत्ता येईल, मी जलसंपदा मंत्री होईल याची कल्पना देखील नव्हती, मात्र योगायोगाने ही जबाबदारी माझ्यावर आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. एकनाथ खडसे यांच्या हस्ते या धरणाचं भूमीपूजन झालं आणि त्यांच्याच हस्ते या धरणाचं उद्घाटन केलं जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


जलसंपदा मंत्री जळगावचे असूनही पाडळसरे धरणाच्या कामाकडे दुर्लक्ष; नाव न घेता खडसेंचा गिरीश महाजनांना टोला