नागपूर : भोसरी जमीन खरेदीप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीसमोर हजेरी लावली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास खडसे नागपुरात झोटिंग समितीसमोर वकिलासह हजर झाले.


साधारण 40 मिनिटांच्या चौकशीनंतर खडसे बाहेर आले. याप्रकरणाची पुढील चौकशी 21 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 21 फेब्रुवारीलाही खडसेंना नागपुरात हजेरी लावावी लागणार आहे.

दरम्यान, दुसरीकडे आज सरकार भोसरी जमीन खरेदी प्रकरणात दिरंगाई करत असल्याचा ठपका मुंबई हायकोर्टाने सरकारवर ठेवला.

भोसरी जमीन खरेदीप्रकरण काय आहे?

भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन गेल्या महिन्यात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, तीन कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं.

महसूलमंत्री असताना खडसेंनी भोसरीत केलेल्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आले. त्यानंतर याप्रकरणाच्या चौकशीसाठी एका वर्षापूर्वी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीस समितीची स्थापना करण्यात आली आहे.