कॅबिनेट, लाल दिवा, प्रोटोकॉल सोडून खडसे मुक्ताईनगरात
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 31 May 2016 08:56 AM (IST)
जळगाव: कॅबिनेट बैठकीपेक्षा मला मुक्ताईनगरची यात्रा महत्वाची आहे, असं उत्तर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलं. आज मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थितित राहत खडसे दिवसभ जळगावात आहेत. सलग होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर खडसे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात जळगावच्या मुक्ताईनगर या त्यांच्या गावात ते लाल दिव्याच्या गाडीऐवजी खासगी गाडीनं आल्यानं अनेक जण कोड्यातही पडले आहेत. तसंच त्यांनी कोणतेही प्रोटोकॉल टाळत सामान्य माणसाप्रमाणे त्यांनी यात्रेला हजेरी लावली. काल रात्री पुण्याच्या भोसरीमधल्या एमआयडीसीच्या भूखंडाप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुमारे 40 मिनिटे ही भेट झाली. याच भेटीनंतर एकनाथ खडसे यांचं महसूलमंत्रीपद रद्द होण्याच्या बातमीला पंख फुटले आहेत. महसूलमंत्रिपद गमावणार? एकनाथ खडसेंमुळे सरकारवर डाग लागत असल्यामुळे त्यांचं महसूलमंत्रिपद काढून घेण्यात येणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यासाठी खडसेंनी कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजेरी लावल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी खडसेंचा महसूलमंत्रिपदाचा भार काढून घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींनी राज्यातील सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचं लक्ष आहे. खडसेंवरील आरोप *कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक *जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप *दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा * भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद