जळगाव: 'निवडणुकीमध्ये हरवू शकत नाही म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली आहे.' असं वक्तव्य दाऊद प्रकरणावरणावर बोलताना महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी काल जळगावात केलं. 'नाथा भाऊच्या बदनामीची मोहिम गेल्या काही दिवस सुरु आहे. पण राजकारणाच्या डावपेचात मी कच्चा नाही.' असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.


 

दरम्यान, कथित दाऊद कॉलप्रकरणी केंद्रीय नेतृत्त्वाने गंभीर दखल घेतल्याचं भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी काल सांगितलं. तसंच राज्य सरकारनं याप्रकरणी चौकशी सुरु केली असून, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही शाह यांनी नमूद केलं.

 

खडसेंवर सध्या आरोपांची मालिका सुरु आहे. खडसेंसाठी आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

 

काल भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त पत्रकार परिषद घेतली. एकीकडे दोन वर्षात भाजपवर एक रुपयाच्याही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही असं अमित शहा सांगत होते. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या मंत्र्यावर हे आरोप होतायत, त्याचं काय अशा प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागत होतं.

 

पत्रकार परिषदेत बोलताना शहांनी या प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं योग्य ती चौकशी सुरु झाल्याचं सांगितलंच. मात्र नंतर अनौपचारिक गप्पांमध्ये या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं अमित शहांनी नमूद केलं.

 

खडसेंबद्दलचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांना घ्यायचाय, मी त्यांच्या कामात ढवळाढवळ करणार नाही असं शहांनी म्हटलं आहे. प्रकरण गंभीर असल्याचं मी मानतो, एकदा मीडियातली चर्चा थांबली की आम्ही त्याबद्दलची चर्चा करु असं शहांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

 

त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असतानाच आता 11 खाती असलेल्या खडसेंचं भाजप काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

गेल्या 15 दिवसांपासून खडसेंवरच्या तीन आरोपांची चर्चा केवळ  महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातल्या मीडियात सुरु आहे. द्वितीयवर्षपूर्तीच्या जल्लोषाला या आरोपांमुळे काहीसा अपशकून झाल्याचीही कुजबूज दिल्लीतल्या वर्तुळात सुरु आहे.

 

दाऊद -खडसे कथित कॉल प्रकरण

 

मंगेश भंगाळे या इथिकल हॅकर्सने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला. दाऊदच्या कॉललिस्टमध्ये 10 भारतीय नंबर होते, त्यापैकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला.

 

मंगेश भंगाळेनेच 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करुन दाऊदनं कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती बाहेर आणली होती. त्यात आढळलेल्या ४ क्रमांकात एक नंबर खडसेंचा आहे, असंही त्यानं म्हटलं होतं.

 

संबंधित बातम्या:

'खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल'


खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण


दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र


दाऊदला कॉल प्रकरणी खडसेंना पोलिसांचा दिलासा


खडसेंचा राजीनामा घेऊन चौकशी करा: प्रीती मेनन


‘दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार’, प्रीती मेनन यांची माहिती


पैसे घेऊन आरोप करणाऱ्या दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार : खडसे


‘खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा’