बेळगाव : आगीत होरपळून आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री घडली. रघुनाथ पेठ अनगोळ येथे ही घटना घडली. देवासमोरील दिव्याची पेटती वात कपड्यावर पडल्याने अंथरुणासह घराने पेट घेतला आणि त्याच लहान मुलीचा होरपळून मृत्यू झाला. कस्तुरी रामू मलतवाडी असं मृत मुलीचं नाव आहे.

अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलतवाडी कुटुंबीय जेवण करुन नेहमीप्रमाणे झोपले होते. रात्री दीडच्या सुमारास दिव्यातील पेटती वात उंदराने तोंडात धरुन घरात ठेवलेल्या कपड्यावर आणून टाकली. त्यामुळे आधी घरातील कपड्यांनी पेट घेतला, त्यानंतर इतर वस्तू पेटल्या. त्यावेळी कस्तुरीच्या आईने बाजूला झोपलेला एक मुलगा व दुसर्‍या मुलीला हाताला धरुन घराबाहेर आणले. परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे कस्तुरीला बाहेर आणणं शक्य झालं नाही.

कस्तुरी घरात अकल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी धावपळ करत आत प्रवेश केला. परंतु, संपूर्ण घराला वेढलेल्या आगीमुळे कस्तुरीचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात आग आटोक्यात आणली. घराचंही आगीमुळे मोठं नुकसान झालं. टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.