Eid Mubarak 2023 : ईद मुबारक! देशभरात देशात आज साजरी होतेय ईद-उल-फित्र, महिनाभर रोजा ठेवल्यावर आज सेलिब्रेशनचा मूड
रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासानंतर (रोजा) ईदचा सण सर्वांमध्ये उत्साह घेऊन आला आहे. सर्व मशीद आणि ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. लोक एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत आहेत.
Ashok Chavan: रमजान ईदनिमित्त नांदेडमध्ये मुस्लिम धर्मियांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करत ईद उत्साहात साजरी केलीय. यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी राज्यातील जनतेला अक्षय तृयीया महात्मा बसवेश्वर तथा परशुराम जयंती आणि ईद या योगायोगाने एकत्रित आलेल्या सणाच्या शुभेच्छा दिल्या.
Parbhani News: महिनाभर कडक उपवास केल्यानंतर आज मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना संपला आणि आज सर्वत्र ईद साजरी करण्यात आली.परभणीत मोठ्या उत्साहात आणि शांततेत ईद साजरी करण्यात आली. सकाळी ईद निमित्त मुस्लीम बांधवांकडून परभणी शहरातील इदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा करण्यात आली.यावेळी मोठ्या संखेने मुस्लीम बांधवांनी रमजान ईद निमित्त नमाज अदा केली नमाज झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. देशाची शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी यासाठी मुस्लीम बांधवांकडून एक विशेष प्रार्थना हि यावेळी करण्यात आली.
Akola News: आज मुस्लिमांचा पवित्र सण ईद-उल-फित्र.... अकोला जिल्ह्यात आज ईद उत्साहात साजरी करण्यात आलीय. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना काल शुक्रवारी संपलाय. अकोल्यात हरिहरपेठ भागातील मोठ्या ईदगाह मैदानावर आज सकाळी मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केलीय. यावेळी ईदगाहवर सर्व धर्मियांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्याय. अकोल्यातील मुस्लिम बांधव एकत्रितपणे ईदगाह मैदानावर ईद साजरी करतात.
AhmedNagar News: अहमदनगर शहरामध्ये ईद निमित्ताने सामूहिक नमाज पठण करण्यात आले, कोठला मैदानात नमाज पठण करण्यात आले. यावेळी पंधरा हजार मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. ईद गाह मैदानाला लागूनच नगर-पुणे महामार्ग असल्याने आणि या रस्त्यावर देखील मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी उपस्थित असल्याने या रस्त्यावरील वाहतूक दुपारपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. यावेळी अमन शांतीचा संदेश देत कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, जातीय तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नये, कुठल्याही विषयाची खात्री केल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देऊ नये असा संदेश देण्यात आला. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
Kalyan News: देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे . ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात हजारो मुस्लिम बांधव एकत्रितपणे नमाज अदा करत असतात .दरवर्षी प्रमाणे यंदाही दुर्गाडी किल्ला परिसरात इद निमित्त एकच उत्साह दिसून आला सकाळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या परिसरात जमा झाले होते . यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय शांतता आणि अखंडता कायम रहावी, अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली. त्यानंतर गळाभेट घेऊन लहान-मोठ्यांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या.
Malegaon News: नाशिकच्या मालेगावात ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण केले आहे. ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांची उपस्थिती आहे.
पार्श्वभूमी
Eid-Ul-Fitr 2023 : देशासह जगभरात आज 'ईद-उल-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद' साजरी केली जात आहे. हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. ईद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण मानला जातो. प्रत्येक मुस्लिम बांधव या खास दिवसाची वाट पाहत असतात. या दिवशी प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना मिठी मारत त्यांना ईदच्या शुभेच्छा देतो. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासानंतर (रोजा) ईदचा सण सर्वांमध्ये उत्साह घेऊन आला आहे. सर्व मशीद आणि ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. लोक एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत आहेत.
महिनाभराच्या रमजाननंतर अखेर आज ईदचा चंद्र दिसला. चंद्र दिसताच लोकांनी एकमेकांना मिठी मारली आणि अभिनंदन केलं. ईदचा चंद्र दिसल्याने शेवटची नमाज-ए-तरावीहची झाली. रमजानचा चंद्र दिसल्यानंतर मशिदींमध्ये सुरू झालेल्या तरावीहच्या विशेष नमाजाची सांगता झाली. मौलाना आणि मौलवी यांनी ईदचा सण शांततेत आणि प्रेमानं साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
शव्वालचा चंद्र पाहून साजरी केली जाते ईद
ईद हा सण शव्वालचा चंद्र पाहून साजरा केला जातो. शव्वाल हे अरबी कॅलेंडरमधील एका महिन्याचे नाव आहे. हा महिना रमजान महिन्यानंतर येतो. शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र साजरी केली जाते. ईद उल फित्रला मिठी ईद असेही म्हणतात. या दिवशी शेवया किंवा खीरसह अनेक गोड पदार्थ बनवले जातात. नंतर लोक एकमेकांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देतात.
रमजान महिन्याचं महत्त्व
इस्लाम धर्मात रमजान महिन्याला मोठे महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लीम बांधव उपवास करत असतात. याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लामने दानधर्माचे प्रंचड महत्व सांगितले आहे. रमजान महिन्यातच इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेले कुरान अवतरित झाले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे.
मुस्लिम बांधवांसाठी सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू असल्याने बाजारपेठेत मिठाई, सुका मेवा, फळे, खजूर यांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून रमजान ईद साजरी केली जाते. मुस्लिम बांधवांकडून महिनाभर केलेला उपवास रोजा ईदच्या दिवशी सुटत असतो. मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाते. लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करत असतात. शिरखुर्मा गोड (Shirkhurma) पदार्थावर रोजाचा समारोप केला जातो. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांकडून नवीन कपडे, शिरखुर्मासाठी लागणारे पदार्थ तसेच अन्य विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विशेषतः कपड्यांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -