जळगाव: नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका अजूनही बळीराजाला बसतोच आहे. शेतमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झालेला असताना, जळगावातही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. जळगावात 10 ते 15 रूपये किलोनं विकली जाणारी भरताची वांगी चक्क 50 पैसे किलो या दरांपर्यंत खाली घसरली आहेत. या परिस्थितीमुळे वांगं उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे.


एरव्ही हिवाळ्याच्या दिवसात दहा ते पंधरा रुपये किलो दराने विकली जाणारी भारताची वांगी केवळ 50 पैसे किलोने सुद्धा घ्यायला कोणी तयार नसल्याने वांगे उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून दरात कोणतीही सुधारणा नसल्याने रोज नुकसान सोसण्यापेक्षा अनेक शेतकऱ्यांनी आपली शेत रोटर करून घेण्यास सुरुवात केली आहे.

उत्पादनाचा खर्चही निघत नसल्य़ानं पाचोऱ्यातील शेतकरी राहुल पाटील यांनी आपल्या पाच एकर मिरची आणि तीन एकर भरताचे वांग्याच्या पीकावर रोटावेटर फिरवला आहे. राहुल यांना जवळपास साडेआठ लाखांचा फटका बसला असून, सराकारने किमान हमीभावाचं आश्वासन द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.