मुंबई : देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट, युजीसी नेट (UGC NET) परीक्षांवरुन सावळा गोंधळ सुरू आहे. एनटीएमार्फत घेतली जाणारी युजीसी नेट परीक्षा रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने आता परीक्षेला अवघे 12 तास शिल्लक असताना नीट (NEET) पीजी परीक्षाही रद्द केली आहे. त्यामुळे, नीट पीजी परीक्षांची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे नीट-नेट परीक्षांमधील सरकारच्या भोंगळ कारभारावरुन विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही, असे म्हणत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तर, शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) व प्रियंका चतुर्वेदी यांनीही सरकारला लक्ष्य केलं आहे.   


पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते. मात्र, याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे. अवघ्या 12 तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी. मात्र, केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच,  या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असेही त्यांनी म्हटले. 


शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या परीक्षांवरुन सुरू असलेल्या गोंधळावरुन शिवसेने नेते आदित्य ठाकरे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही भूमिका मांडली आहे. देशात शिक्षण आणीबाणी लावण्यात आलीय, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तर, वन नेशन वन इलेक्शनच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला एक परीक्षा नीट घेता येईना, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. 


काय म्हणाले आदित्य ठाकरे


आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून देशभरात सुरू असलेल्या सीईटी, नीट आणि नेट परीक्षांतील घोळावर भाष्य केलं. काल CET च्या परीक्षांसंदर्भात उत्तर द्यायला डायरेक्टर होते, पण त्यांच्याकडे उत्तर नव्हते. विद्यार्थ्यांचे पैसे रिफंड होणार का, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी अद्याप उत्तरपत्रिका हातात का नाही देत, असेही म्हटले. तसेच, नीट परीक्षांबाबत जो कोणी चूक आहे, त्यावर कारवाई व्हायलाच हवी, पण होईल असं मला वाटत नाही, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले. 


धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा


"मी म्हणेन की या देशात शैक्षणिक आणीबाणी लागू आहे, ज्याप्रमाणे परीक्षा रद्द केल्या जात आहेत, एका पाठोपाठ एक परीक्षा रद्द होत आहेत, पेपर पुढे ढकलले जात आहेत. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदारी घेत नाहीत. देशातील NEET परीक्षांच्या चौकशीला त्यांनी नकार दिला आहे. केवळ एनटीए अध्यक्षांची बदली करुन काम झालं का, संपूर्ण शिक्षण विभाग यास जबाबदार असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा'', अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.  






एनटीए महासंचालकांची हकालपट्टी


एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) च्या वतीने घेण्यात आलेल्या नीटच्या निकालानंतर झालेल्या गोंधळावरुन कारवाईला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने शनिवारी रात्री एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची तडकाफडकी हकालपट्टी करून त्यांच्या जागी प्रदीप सिंह खरोला यांची हंगामी नियुक्ती केली आहे, तर नीटमधील कथित अनियमिततेची चौकशी सीबीआयकडे सोपविली जाईल, असे शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी रात्री सांगितले.