ED Summons to Shiv Sena MP Sanjay Raut : नवी दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत ईडीसमोर हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या वकिलांनी ईडीकडे सूट मागितली. आज चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं संजय राऊतांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. पण संसदेच्या कामामुळे उपस्थित राहाता येत नसल्यामुळे पुढील तारीख राऊतांनी मागितली होती. ईडीने राऊतांना पुढील तारीख दिली आहे. 

संजय राऊत यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांना सात ऑगस्टपर्यंत सूट मागितली आहे, जी ईडीने मान्य केली आहे. संजय राऊत सात ऑगस्टनंतर ईडीसमोर हजर राहणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांचे वकील विक्रांत सापने यांनी दिली.  

दरम्यान, यापूर्वी ईडीनं संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीनं प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची 9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी ईडीकडून संजय राऊतांची चौकशी करण्यात आली होती. संजय राऊत यांची 1 जुलै रोजी ईडीनं तब्बल 10 तास चौकशी केली होती. ईडीही केंद्राची तपासयंत्रणा असून आपण ईडीला पूर्ण सहकार्य केलं. त्यांच्या मनात काही शंका असतील तर आमच्या सारख्या लोकांनी त्या दूर केल्या पाहिजेत, असा खोचक टोला देखील संजय राऊत यांनी लगावला होता. 

संजय राऊतांना ईडीनं का पाठवलं समन्स? ईडीनं 1 फेब्रुवारी रोजी ECIR दाखल केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. 

प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, प्रवीण राऊतांचं नाव PMC घोटाळ्यातही आलं होतं. ज्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं की, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. याप्रकरणी वर्षा आणि माधुरी यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. 

सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी एका वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीनं अलिबागमध्ये भागीदारीमध्ये जमीन खरेदी केल्याचंही उघडकीस आलं आहे. त्यामुळेच संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं होतं. आता पुन्हा याच प्रकरणी संजय राऊतांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे.