मुंबई: महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या दोन एफआयआयरवरून ईडीने नाना पटोलेंचे वकील सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांच्यावर मनी लॉंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सतीन उके यांना मुंबईतील PMLA कोर्टासमोर दाखल केल्यानंतर त्यांना 6 एप्रिलपर्यंत ईडीची कस्टडी देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे सतीश उके यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. 


 




कोट्यावधींचा भूखंड बळकावत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नागपूरमधील वकील सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं 6 एप्रिलपर्यंत अंमलबाजवणी संचालनालय (ईडी) च्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश दिले. सध्या या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असल्यानं ताब्यात घेऊन चौकशीची तपासयंत्रणेची मागणी मान्य करत असल्याचं न्यायालयानं आपल्या आदेशांत स्पष्ट केलं आहे.  


राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर आरोप करत न्यायालयात खटले दाखल केल्यानंच उके यांचं नाव चर्चेत आलं होतं. आपल्या साथीदारांच्या मदतीनं शस्त्राचा धाक दाखवत बोखारा येथील साडेपाच एकर भूखंड बळकावल्याचा गुन्हा अजनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ईडीनं उकेंविरोधात चौकशी सुरू केली होती. गुरुवारी नागपुरात तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अॅड. उके आणि त्यांच्या भावाला अटक केली.


जमीन गैरव्यवहार प्रकरणी सतीश उके नागपूर पोलिसांच्या रडारवर होते. 2018 साली त्यांना एका जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकही झाली होती. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोन महिन्यांची शिक्षा सुनावल्यानंतरही ते पोलिसांना शरण न आल्याने त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही नागपूर खंडपीठाने दिले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवल्याचा आरोप करत सतीश उकेंनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


ABP Majha