गडचिरोली: निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. पण आता त्यांच्याविरोधात गुन्हा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याने महादेव जानकर यांच्या अडचणीत भर पडली आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली होती. शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचनाही यावेळी जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिल्या. यासंबंधिचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे वृत्त वाहिन्यांवरुनही प्रसारित झाले. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत, जानकरांविरोधात तक्रार दाखल केली होती.

यानंतर निवडणूक आयोगाने महादेव जानकरांना नोटीस बजावून 24 तासात उत्तर देण्यास सांगितले होते. यावर आपण  निवडणूक अधिकाऱ्यावर कसल्याही प्रकारे दबाव आणले नसल्याचे स्पष्टीकरण महादेव जानकर यांनी एका जाहीर पत्रकारद्वारे दिले होते.

पण आता त्यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करायचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार महादेव जानकर व देसाईगंज येथील जेसा मोटवानी यांच्या विरूद्ध शनिवारी रात्री उशिरा देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांना निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव नव्हे, विनंती केली, जानकरांचं स्पष्टीकरण

काँग्रेसचा अर्ज बाद करायचा, महादेव जानकरांचा व्हिडीओ व्हायरल