शिर्डी : तीन दिवसीय गुरू पौर्णिमा उत्सवाच्या काळात साईभक्तांनी साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचं दान केलं आहे. गुरुपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये तीन दिवसात साईंच्या झोळीत 04 कोटी 52 लाखांचं दान प्राप्त झालं आहे.


15 जुलै ते 17 जुलै दरम्यान पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये साईंच्या दानपेटीत एकूण 04 कोटी 52 लाख देणगी प्राप्‍त झाली आहे. यामध्ये दक्षिणापेटीत 02 कोटी 12 लाख, देणगी काऊंटरवर 01 कोटी 07 लाख, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन, चेक-डीडी, मनी ऑर्डर देणगी आदीव्‍दारे 01 कोटी 03 लाख तर सोने 645.015 ग्रॅम ( 18 लाख 87 हजार ) चांदी 5032 ग्रॅम (01लाख 30 हजार ) याशिवाय 17 देशांचे परकीय चलन अंदाजे रुपये 08 लाख 94 असा समावेश आहे.



गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या कालावधीत 01 लाख 86 हजार साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्‍ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश आहे. साई प्रसादालयामध्‍ये 02 लाख 541 साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर दर्शन रांगेतून 02 लाख 10 हजार 400 साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍यात आल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

साई संस्थानच्या विविध राष्ट्रीयीकत बँकांमध्ये एकूण 2330 कोटींच्या ठेवी आहेत. यामध्ये 443 किलो सोनं, 5386 किलो चांदीचा समावेश आहे. यावरून साईसंस्थानच्या श्रीमंतीचा अंदाज बांधता येतो.