सांगली : कोरोना संशयित मृत्यू असल्याच्या अफवेमुळे एका तरुणाचा मृतदेह चक्क कचरा गाडीतून नेऊन अंत्यसंस्कार करण्याची घटना घडली आहे. सांगलीच्या जतमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


सांगलीच्या जतमध्ये सोमवारी (25 मे) रात्री एका तरुणाचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातून हा तरुण 11 मे रोजी आपल्या जत या गावी परतला होता. त्यानंतर 14 दिवसांसाठी तरुणाला होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र त्या तरुणाला त्रास होऊ लागल्याने जत मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला होता. तर त्याच्या मृत्यूनंतर जत शहरात सदर तरुणाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याची जोरदार अफवा सोशल मीडियावर पसरली होती. जत शहर आणि नगरपालिका यंत्रणा हादरून गेली होती.मात्र सदर तरुणाचा मृत्यू हा अन्य कारणाने झाल्याचे समोर आले होते.तर मृत तरुणांच्या नातेवाईकांनी लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने जत नगरपालिका प्रशासनाला अंत्यसंस्कार करण्याची विनंती करण्यात आली होती. प्रशासनाकडून सर्व त्या खबरदार्‍या घेऊन हा अंत्यसंस्कार करण्यात आला. मात्र यातली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या मृत तरुणाचा मृतदेह नगरपालिकेच्या एका कचरा घंटागाडी मधून घेऊन जाण्यात आला. एक प्रकारे या तरुणाचा अंत्ययात्रा ही कचरा गाडीतून काढण्यात आली आहे. पालिका प्रशासनाकडून हा अंत्यविधी पार पाडला जात,असताना कचरा गाडीचा वापर केल्याचा व्हिडीओ समोर आल्याने जत शहरात खळबळ उडाली आहे.


तरी याबाबत जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित हाराळे यांच्याशी संपर्क साधला असता,सदर तरुणाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. केवळ सोशल मीडियावर अफवा पसरली की, सदर तरुणाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. त्यानंतर शहरातील परिस्थिती ही गंभीर बनली होती. त्यामुळे प्रशासनाला सदर तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे यावे लागले. मात्र नगरपालिका आणि तालुक्यात कोणाकडेही शव वाहिका नसल्याने पालिका प्रशासनाने मृतदेह वाहून नेण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली होती. मात्र सहा तास उलटून गेल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शहरातील अन्य वाहनातून मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या अफवेमुळे कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाकडे कोणताच पर्याय नसल्याने कचरा घंटागाडी याचा पूर्ण सॅनिटायझेशन करून कोणतीही विटंबना न करता त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडल्याचं मुख्याधिकारी हराळे यांनी सांगितले. केवळ कोरोना बाधित असल्याच्या अफवेमुळे हा सर्व प्रकार घडल्याचे हाराळे यांनी स्पष्ट केले आहे.


मात्र एका तरुणावर अशा पद्धतीने कचरा गाडीतून अंत्यसंस्कार करायची वेळ नगरपालिका प्रशासनावर आली हे दुर्दैव म्हणावे लागेल. या सर्व प्रकारानंतर नगरपालिका प्रशासनाकडे कोणत्याच प्रकारची रुग्णवाहिका नाही ही धक्कादायक बाब सुद्धा समोर आली आहे. त्यामुळे जत तालुक्यात या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.