पंढरपूर : सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळच्या सलग सुट्ट्या मिळाल्यामुळे आज पहिल्याच दिवशी विठ्ठल मंदिर भाविकांनी फुलून गेलं आहे. दर्शनासाठी विठूरायाचरणी भाविकांची रांग लांबतच चालली आहे. या सुट्ट्यांमुळे बाहेर पडलेल्या पर्यटकांची गर्दी अजूनही वाढू लागल्याने पंढरपूरला यात्रेचे स्वरूप आले आहे. यात ऑनलाईन दर्शनामुळे इतर भाविकांना वेळ लागत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत.


राज्यभरातील पर्यटकांची अलोट गर्दी झाल्याने मंदिर व्यवस्थापनाने जादा सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. मावळत्या वर्षाला विठूरायाच्या साक्षीने निरोप देण्यासाठी ही गर्दी वाढत चालली असून आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात मधील पर्यटकांची वाढती संख्या पाहता आणखी दोन विठ्ठल मंदिर ओव्हरफ्लो राहण्याची शक्यता आहे. ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी 5 हजार भाविकांनी बुकिंग केल्याने आता थेट दर्शनाला आलेल्या भाविकांना 4 ते 5 तासांचा वेळ लागत आहे .

याबाबत भाविकांनी तक्रारी करण्यास सुरुवात केल्या असून या ऑनलाईन दर्शन रांगेमुळे इतर भाविकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची देखील सोय नसून स्वच्छतागृहेदेखील अस्वच्छ व अपुरी असल्याच्या तक्रारी भाविक करीत आहेत.