रायगड : रायगड जिल्ह्यातील रसायनीतील पाताळगंगा परिसरातील हिंदुस्तान ऑरगॅनिक्स केमिकल कंपनीतील वायू गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये अनेक माकडे आणि कबुतर मृत्यूमुखी पडली आहेत. याप्रकरणी हिंदुस्थान ऑरगॅनिक्स केमिकल लिमिटेडच्या 9 अधिकारी, कर्मचाऱ्यांना वन विभागानं ताब्यात घेतलं आहे.


काल रात्री 10 च्या सुमारास घडलेल्या या घटनेची कंपनीनं कुणालाही कल्पना न देता परस्पर प्राण्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे. घटनेनंतर कंपनीने प्राण्यांचे मृतदेह जाळले आणि पुरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


मात्र परिसरातील लोकांना आज प्राण्यांच्या कुजलेल्या मृतदेहांचा वास आल्यानं कंपनीचं काळकृत्य समोर आलं. 31 माकडे आणि 11 कबुतर मृत्युमुखी पडल्याची अधिकृत माहिती वनविभागाने दिली आहे. याप्रकरणी कंपनीच्या 9 अधिकारी, कर्मचाऱ्यांना वन विभागानं ताब्यात घेतलं आहे.


वनविभागानं ताब्यात घेतलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती वनविभागाने दिला आहे. प्राण्यांच्या शिकारीचा आणि परस्पर पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यात 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.


सुरुवातील कंपनीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही कंपनीवर करण्यात येत आहे.