दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं आहे. अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेतले. मागण्या मान्य न झाल्यास दोन दिवसात पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलक मुलींनी दिला आहे.
पुणतांब्यात कृषीकन्या गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत होत्या. दीड वर्षांपूर्वी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पुणतांबा गावातून युवतींनी एकत्र येत सरकार विरोधात एल्गार पुकारला होता. पुणतांबा गावातील शुभांगी जाधव, निकिता जाधव व पूनम जाधव या शेतकरी कन्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या तीनही मुलींची कालच तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, मुलींची तब्येत बिघडल्याने पोलिसांनी बळजबळीने मुलींच्या या आंदोलनावर कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईला आंदोलक मुलींनी आणि ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यावेळी आंदोलक धनंजय जाधव यांच्यासह इतर काही जणांना ताब्यात घेतलं. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुणतांब्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणतांबा गावातून 'देता की जाता' असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीनं राज्यभर यात्रा सुरु आहे. तर दुसरीकडे पुणतांबामधील कृषीकन्याही आक्रमक झाल्या आहेत. सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर सरकारने आमची शेती करावी. त्याबदल्यात आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा पगार द्यावा, अशी मागणी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या तरुणींनी केली आहे.
दरम्यान या आंदोलनासाठी विविध संघटनांनी मुलींची भेट घेऊन पाठिंबा दिला होता. ग्रामस्थांनी भीक मांगो आंदोलन करत भीक मागून मिळणारा निधी मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डरने पाठवला आहे. नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा देत गाव कडकडीत बंद ठेवलं होतं. पुणतांबा गावातील शाळकरी मुलींनी आंदोलनात सहभाग घेत आंदोलन करणाऱ्या मुलींच्या समर्थनार्थ गावातून काळे झेंडे घेऊन फेरी काढली होती.