मुंबई : आधीच महाराष्ट्रातील 151 तालुके दुष्काळात होरपळत आहेत. यातच आणखी चिंता वाढवणारा अंदाज स्कायमेटने दिला आहे. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता स्कायमेट या खाजगी वेधशाळेने वर्तवली आहे. यंदा दीर्घ कालावधीत सरासरीच्या केवळ 93 टक्केच पाऊस पडणार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशामध्ये सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

VIDEO | यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज | मुंबई | एबीपी माझा


स्कायमेट या खासगी वेधशाळेनं यावर्षीच्या पावसाबद्दल वर्तवलेलं भाकीत सर्वांनाच चिंतेच्या गर्तेत लोटणारं आहे. आधीच महाराष्ट्रातले 151 तालुके दुष्काळात होरपळत असताना, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज स्कायमेटनं मान्सूनपूर्व अहवालात वर्तवला आहे.

यावर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असणार आहे. यंदा सरासरी पावसाच्या 93 टक्के पाऊस तर  जुलैमध्ये सरासरीच्या 91 टक्के पावसाची शक्यता स्कायमेटच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. भारतात सरासरी 289 मिमी पाऊस होतो, तर यंदा फक्त 263 मिमी पाऊस होईल अशी भीती स्कायमेटनं वर्तवली आहे.

मात्र खासगी वेधशाळेचा मान्सूनसंदर्भातला हा अंदाज सरकारची देखील धाकधूक वाढवणारा आहे. यावर्षी नोटबंदीमुळं शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळाला नव्हता. सरकारनं कर्जमाफी जाहीर झाली खरी, मात्र त्याची अंमलबजावणी योग्य होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तर पीकविमा योजना देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.