पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे विवाह सातत्याने लांबणीवर पडत चाललेत तर कोणाच्या तारखा चुकू लागल्यात . यावर जालीम उपाय शोधात पंढरपूर तालुक्यातील एक वधू सातत्याने येत असलेल्या अडचणींवर मात करीत स्वतःच्या लग्नाला एकटीच अमेरिकेला पोचली आणि चक्क वधू - वराने मित्र परिवाराच्या साक्षीने अमेरिकेत विवाह केला.
पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथील मूळ रहिवासी असलेले उत्तम कुंभार यांची कन्या स्मिता आणि कोल्हापूर येथील मूळ रहिवासी असलेले नागेश कुंभार यांचे सुपुत्र अभिषेक यांचा विवाह कुटुंबियांच्या संमतीने मार्च महिन्यामध्ये ठरला होता. ऑनलाइन पद्धतीने एकमेकांना पसंद केल्यानंतर कोरोनाच्या महामारीत पारंपारिक हजारोंच्या व्हराडी मंडळींच्या उपस्थित संपन्न होणारे विवाह सोहळे आधी 50 आणि आता 25 लोकांच्या उपस्थितीत पार पडू लागले . यातच पुन्हा कोरोनाची दुसरी जीवघेणी लाट सर्वत्र आल्याने विवाहात पुन्हा विघ्न आले.
इंडस्ट्रियल इंजिनियरिंगमधून M S केलेला अभिषेक अमेरिकेतील नामवंत कंपनीत जॉबला असल्याने भारतात येण्याचा व्हिसा त्याला मिळत नव्हता. त्यातच कोरोनाचे संकट कमी होईल आणि दोन्ही कुटुंबीयांना विवाह गावाकडे साजरा करता येईल म्हणून वाट पाहिली मात्र नऊ महिने झाले तरी कोरोनाचे संकट कमी होत नसल्याने भारतातून अमेरिकेला जाण्यासाठी एकट्या नवरी मुलीलाच व्हिसा मिळाला आणि पंढरपूरची लेक एकटीच विवाहासाठी अमेरिकेला पोहोचली.
पंढरपुरात मतदान होते त्याचदिवशी म्हणजे 17 एप्रिल रोजी मिशिगन शहरातील वेंकटेश्वरा मंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अमेरिकन वेळेनुसार सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी त्यांचा विवाह संपन्न झाला. स्मिता आणि अभिषेकच्या कुटुंबीयांनी ऑनलाईन फेसबुक आणि यूट्यूब वरूनच विवाह सोहळ्यास हजेरी लावली व नव वधू-वरांना आशीर्वाद दिले . पण कोरोनामुळे येत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी या मराठी पोरीने आपल्याच लग्नाला एकटी अमेरिकेत जाण्याचे धाडस दाखवले आणि सातासमुद्रापार विवाहाची लग्नगाठ बांधली.