पालघर : डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकानं दारु पिऊन शाळेसमोर धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी 23 जूनला या शिक्षकानं दुपारी शाळेसमोर गोंधळ घातला. स्थानिकांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


डहाणू तालुक्यातील बोर्डी केंद्राअंतर्गत येणाऱ्या जांबूगावमधील तलाईपाडा जिल्हा परिषद शाळेसमोर हा प्रकार घडला आहे. शामकांत पवार असं या शिक्षकाचं नाव आहे. तो झिंगत शाळेत येत असल्याचे लक्षात येताच, स्थानिकांनी त्याची चौकशी केली. यावेळी शिक्षकानं मद्य प्राशन केल्याचं झिंगत-झिंगतच शिक्षकाने सांगितलं. या घटनेचे फोटो व चित्रिकरण स्थानिकांनी केलं होतं.

दारु पिऊन झिंगणारा शिक्षक शाळेची पायरीही चढू शकला नाही. वर्गात जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत असताना तो शाळेच्या आवारातच कोसळला. तब्बल तीन ते चार तास हा शिक्षक तेथेच रेंगाळत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल आहे. या दारुड्या शिक्षकाची करामत पाहून विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली होती. त्यामुळे  नशेबाज शिक्षकावर कारवाईची मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

शाळा प्रवेशाच्या दिवशी याच शिक्षकाने फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं होतं. त्यानेच आठ दिवसानंतर दारु पिऊन शाळेसमोर धिंगाणा घातल्याचं पाहून विद्यार्थ्य़ांना धक्का बसला आहे.