नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदर्श गाव योजनेसाठी दत्तक घेतलेल्या नागपुरातील पाचगाव पोलीस चौकीत मद्यधुंद अवस्थेत मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांना अपशब्द बोलणारा आणि तक्रारकर्त्यांशी वाद घालणाऱ्या पोलीस कर्मचारी प्रदीप मने याला पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने दारु पिऊन धिंगाणा घालत नागपूर पोलिसांची अब्रूच काढली होती. नागपूरच्या कुही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका पोलीस चौकीत हा प्रकार घडला. या कर्मचाऱ्याने फक्त पोलीस विभागाची लाजच काढली नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्वांच्या नावाने शिव्या देत अनेकांचा उद्धार केला होता.

काय आहे प्रकरण?
24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री गावात झालेल्या एका भांडणाची तक्रार करायला काही तरुण पाचगाव पोलीस चौकीत गेले होते. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित प्रदीप मने नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या तरुणांची तक्रार लिहून घेण्यास नकार दिला आणि शिवीगाळ केली.

पोलीस कर्मचारी पोलीस चौकीमध्येच मद्यधुंद अवस्थेत असल्याने तरुणांनी त्या कर्मचाऱ्याची ती अवस्था आणि वर्तन मोबाईलमध्ये चित्रित करणं सुरू केलं. त्यामुळे तो पोलीस कर्मचारी आणखी भडकला आणि त्याने मुख्यमंत्र्यांपासून, मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने शिव्या देणं सुरू केलं. पोलीस कर्मचाऱ्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये सामान्यांना मद्यधुंद अवस्थेत कशी वागणूक दिली जाते याची चर्चा सुरु झाली. या कर्मचाऱ्याविरोधात कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली होती. अखेर पोलीस कर्मचारी प्रदीप मने याला पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.