सांगली : पाण्यासाठी दुष्काळग्रस्तांनी मंत्रालयावर धडक देण्यासाठी पायी दिंडी काढली आहे. सांगलीतील दुष्काळी जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या 46 गावांनी या पायी दिंडीला सुरुवात केली आहे. पाण्याचा कायमचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार करत आता थेट सरकारच्या दारात जाण्याची भूमिका या गावांनी घेतली आहे.


सांगली जिल्ह्यातील पूर्व भाग असणाऱ्या जत तालुक्यात यंदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जवळपास 100 टॅंकर तालुक्यात सध्या पाणी पुरवठा करत आहेत. तर म्हैसाळ सिंचन योजनेतून तालुक्यात थोड्या प्रमाणात पाणी पोहोचले आहे. मात्र पूर्व भागातील 46 गावं आजही पाण्यापासून वंचित आहेत. या ठिकाणी कोणतीही योजना पोहोचू शकलेली नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यातून पाणी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता मात्र त्याची अमंलबजाणी झाली नाही.


लोकसभा निवडणुकीच्या आधी खासदार संजयकाका पाटील यांनी पाणी टंचाई असलेल्या गावांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी म्हैसाळ विस्तार योजना तयार केली. या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंजुरी दिली. प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार याबाबत दुष्काळग्रस्तां गाावांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे जत तालुक्यातील अध्यात्मिक गुरु तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली 46 गावांनी पाण्यासाठी आता आरपारची लढाई सुरू केला आहे.


पाणी मिळावे यासाठी थेट मंत्रालयापर्यंत पायी दिंडीला सुरुवात केली आहे. जत तालुक्यातील संख येथून या पायी दिंडीला सुरुवात झाली आहे. तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 400 हून अधिक दुष्काळग्रस्त या दिंडीत सहभागी झाले. असंगी, गुड्डापूर, सोरडी, वळसंग मार्गे दुपारी जतमध्ये ही दिंडी पोहचली. यावेळी जत तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


सरकारकडून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न निकालात काढला जात नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका या गावांनी घेतली आहे. तसेच मंत्रालयापर्यंत कोणत्याही परिस्थितीत जाणार, असा निर्धारही तुकाराम बाबा महाराज आणि दुष्काळग्रस्तांनी यावेळी व्यक्त केला. पाण्यासाठी निघालेल्या या दिंडीला तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जतमध्ये स्वागत करत पाठिंबा दर्शवला. शनिवारी सकाळी कवठेमहाकाळ मार्गे सांगलीकडे ही पायी दिंडी रवाना होणार आहे. 20 जून रोजी ही पायी दिंडी मुंबईमध्ये दाखल होणार आहे.