सांगली : दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याचं चित्र बदलतंय. आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील नेहमी दुष्काळी असणारी 20 गावे आज पाणीदार झाली आहेत. लोकसहभागातून आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅनॉलची झालेली कामे यासाठी उपयोगी ठरली आहेत.
2013 साली आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आले होते. मात्र या गावापर्यंत निधीअभावी या योजनेचे पाणी पोहचले नव्हते. मात्र लोकांनी सरकारच्या पैशाच्या मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून टेंभू योजनेतून पोट कालवा काढण्याची योजना आखली, ज्याला नाम फाऊंडेशनच्या कामाची देखील साथ मिळाली. आज या लोकसहभागातून झालेल्या कामाने नेहमी दुष्काळाच्या झळात जगणाऱ्या या 20 गावातील लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
आटपाडी तालुका म्हटलं की दुष्काळी भाग, पाण्याविना बनलेले ओसाड माळरान हे चित्र उभे राहते. पण हे चित्र देखील बदलण्याची किमया आता साध्य होऊ लागली आहे. आटपाडी तालुक्यातील पश्चिमेकडील 20 गावात, जिथे प्यायला पाणी मिळायचे नाही त्या ठिकाणी ऊसासारखी पिके घेतली जात असल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे.
लोकसहभागातून जवळपास 15-20 किमी काढलेल्या कॅनॉलमधून खानापूर, आटपाडी या दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या टेंभू योजनेचे पाणी आज या गावाच्या शेता-शेतात पोहोचलं आहे. त्यामुळे गावात असणारा एक ना एक बंधारा काठोकाठ भरलेला दिसतो. शिवाय नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून या बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जिथे कुसळे देखील उगवत नव्हती, त्या भागात आज हिरवाई पसरलेली आणि शेती बहरलेली दिसून येते.
पाण्याच्या कमतरतेमुळे आजपर्यंत या भागातील लोक शेतीकडे न वळता पूर्णवेळ मेंढपाळ करणे किंवा शहरात जाऊन कामधंदा शोधणे हीच कामे करत होते. काही गावातील लोक तर ऊस तोडीसाठी देखील कृष्णा नदी काठी येत असत. टेंभू उपसा सिंचन प्रकलपाचे पाणी या भागात जरी आले असले तरी या गावापर्यंत पाणी न पोहोचल्याने त्या पाण्याचा फायदा होत नव्हता. त्यामुळे खरसुंडीजवळ आलेल्या टेंभू उपसा सिंचन प्रकलपाच्या कालव्यातूनच लोकसहभागातून पोट कालवा काढण्याची कल्पना सुचली आणि काम सुरू झाले.
वर्षभराच्या कामानंतर तब्बल 20 गावाच्या भोवती 25-30 किलोमीटर लांबी इतके कॅनाल तयार झाले आणि टेंभू योजनेचे पाणी आपल्या गावात येण्याचे लोकांचे स्वप्न पूर्ण झाले. आज या गावांमध्ये ऊसाबरोबरच वेगवेगळी पिके घेतली जातात, त्याशिवाय आजपर्यंत या गावात सुरु असलेले टँकर देखील बंद झाले आहेत. लोकसहभागातून झालेल्या या कामाने कित्येक वर्षे पाण्याची वाट पाहणाऱ्या लोकांच्या दारात आज पाणी पोहोचले आहे. ज्यामुळे या भागातील शेती तर बहरली आहेच, त्याशिवाय दुष्काळी भाग ही ओळख देखील पुसण्यास मदत होऊ लागली आहे.