Drones fear in villages: महाराष्ट्रातले चोरही आता हायटेक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री ड्रोन उडताना दिसत आहे. अचानक एक ड्रोन येतो, गावात चक्कर मारतो आणि निघून जातो. हा ड्रोन कोणाचाय, कुठून आला, कशासाठी आणि कोण उडवतंय याचा थांगपत्ता पोलिसांनाही नसल्याची परिस्थिती आहे. ड्रोनच्या घिरट्या आणि गावात होणाऱ्या चोऱ्यांमुळं आता ग्रामीण भागात या ड्रोनच्या धास्तीनं लोकांना रात्री गस्त घालावी लागत आहे. नक्की काय प्रकरण आहे? पाहूया..


गावोगावी ड्रोनची नजर


महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोनच्या घिरट्या वाढल्यानं नागरिक चक्रावून गेले आहेत. ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून ड्रोनची अक्षरश: दहशत असल्याचं दिसून येतंय. रात्री लोक आपापल्या घरातून बाहेर पडतायत. पोलिसांच्या गाड्यांना थांबवून चौकशा केल्या जात आहेत. ड्रोन कॅमेराच्या भितीमुळं लोक कीर्तनासाठीही बाहेर पडायला तयार नाहीत. चोऱ्या वाढल्यानं हातावर हात ठेवून बघत बसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.


गेल्या काही दिवसात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री ड्रोन फिरत असल्यानं मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. बीड, संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या अज्ञात ड्रोनच्या दहशतीमुळे घबराट आहे. चोरीच्या उद्देशाने कोणी असे करत नाही ना? या भीतीमुळे ग्रामीण लोक रात्रभर जागून काढत आहेत. बीड जिल्ह्यात गुरुवारी सुमारे 33 गावांमध्ये ड्रोन उडल्याच्या तक्रारी आल्यामुळे पोलीस देखील अलर्ट झाले आहेत.


शेतांमध्ये लाखो रुपयांचं डाळिंब चोरी


ड्रोनचा वापर करून गावागावात हायटेक टोळक्यांच्या चोरीमारी, दरोड्याचे प्रकार वाढले आहेत. शिवारातील लाखो रुपयांचा शेतमाल चोरण्यापासून दरोडा पडल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. चोरांनी शेतांमध्ये चोरी करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. त्यामुळं शेताची निगराणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांधलेले टॉवरदेखील काही करू शकत नसल्याचं शेतकरी सांगतात. 


अहमदनगरच्या शेतकऱ्याच्या लाखोंच्या डाळिंबाची चोरी


अहमदनगरच्या दगडवाडी गावात केल्या काही दिवसांपासून कानिफनाथ शिंदे यांच्या शेतावर ड्रोनच्या घिरट्या वाढल्याचं त्यांनी सांगितलं. या शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेत लाखो रुपयांचे डाळिंब चोरीला गेल्याचं उघड झाल्यानंतर आता नक्की करायचे काय? या पेचात शेतकरी सापडले आहेत. चोर ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हे करून रात्री चोरी करत असल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत.


हेही वाचा:


दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, एकनाथ खडसेंचा खोचक टोला, आता रुपाली चाकणकरांचंही चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या...