सिंधुदुर्ग : ‘एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ असं ब्रीदवाक्य सांगणाऱ्या एसटी महामंडळाला आपल्याच ब्रीदवाक्याचा विसर पडलेला दिसतोय. कारण सिंधुदुर्गात मोबाईलवर बोलत निष्काळजीपणाने एसटी बस चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार बसमधील एका प्रवाशाने कॅमेऱ्यातही कैद केला.

गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू नये, अशा सूचना एसटी प्रशासनाकडून चालकांना दिल्या जातात. त्यासंदर्भात चालकांचे प्रबोधनही केले जाते. मात्र, चालकच या नियमाला हरताळ फासत असल्याचे समोर आले आहे.

सिंधुदुर्गात निष्काळजी एसटी चालक आणि त्याचा बेजबाबदारपणा एका प्रवाशाच्या मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

एसटी बसचा चालक तब्बल दहा मिनिटे मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करत होता. एसटी बस प्रवाशांनी भरलेली होती. बुधवारची म्हणजे 5 सप्टेंबरची ही घटना असून, 4.30 वाजता सुटणाऱ्या देवगड-बोरिवली बसमध्ये हा प्रकार घडला. या चालकाने एसटी बसमधील सर्वच प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला होता.

ज्याच्याकडे एसटी बसची धुरा असतात, त्या चालकानेच असा निष्काळजीपणा केला, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी घेणार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. सिंधुदुर्गातील हा प्रकार प्रवाशाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्याने समोर आला आहे, मात्र कित्येक ठिकाणी असे प्रकार घडत असतील, याची नोंदच नाही. त्यामुळे आता तरी एसटी महामंडळ हे प्रकार गांभिर्याने घेत प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा आहे.

व्हिडीओ :