Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येला आज नऊ वर्ष पूर्ण होतायत. यानिमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन गटांकडून वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. अविनाश पाटील अध्यक्ष असलेल्या गटाकडून सकाळी 7 वाजता डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची जिथे हत्या करण्यात आली तिथून महात्मा फुले पुतळ्यापर्यंत निर्भया वॉकचे आयोजन करण्यात आलंय.
पाच जणांवर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीळ एस.आर.नावंदर यांच्या समोर सुरु आहे. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणांमधील 5 आरोपींविरोधात आरोप निश्चिती झाला आहे. आरोपींविरोधात UAPA कायद्यांतर्गत खटला चालवा अशी मागणी CBI कडून करण्यात आलेली होती. राज्य सरकारकडून UAPA कायद्यांतर्गत खटल्याला परवानगी देण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. सचिन पुनोळकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींविरोधात आरोप निश्चिती झाली.
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दाभोलकर यांची गोळी झाडून हत्या
पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ओंकारेश्वर मंदिराजवळ हत्या करण्यात आली होती. रोजच्याप्रामणे मॉर्निंग वॉक करत असताना त्या दरम्यानच गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. वीरेंद्र तावडे हा या कटाचा मास्टरमाइंड असून त्यानेच सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या हल्लेखोरांना तिथं आणलं होतं असा आरोप सीबीआयनं याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात ठेवला आहे.
कट्टरतावादी लोकांना विरोध केल्याच्या कारणामुळेच डॉ. दाभोलकर यांची हत्या घडविण्यात आली, असा दावाही सीबीआयनं यात केलेला आहे. याशिवाय डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम. कलबुर्गी यांच्या हत्येचे धागेदोरे एकमेकांशी गुंतलेले असल्यानं या सर्व हत्या एका कटाचा भाग आहेत असंही केंद्रीय तपासयंत्रणेनं स्पष्ट केलं आहे.
दोन्ही साक्षीदार पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी
20 ऑगस्ट 2013 ला पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी हे दोन सफाई कर्मचारी तिथे रस्ता साफ करण्याचे काम करत होते. दाभोलकर पुलावरून चालत निघाले असताना दुचाकीवरून आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोलकरांवर गोळीबार केला आणि ते शनिवार पेठेच्या दिशेने पळाल्याचे साक्षीदारांनी न्यायालयात सांगितले.