औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आज (बुधवार) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमए, एमबीए अभ्यासक्रमाचे आज पेपर होणार होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानं विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
या परीक्षांप्रमाणेच प्रात्यक्षिक परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं आजचा एम.फार्म.चा एक पेपर पुढे ढकलला आहे. ही परीक्षा पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात होणार होती.
दरम्यान, राज्याच्या काही भागातील संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.