मुंबई : मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर राजकारण न करता सत्ताधरी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाचे रक्षण केले पाहिजे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. माझा कट्ट्यावर ते बोलत होते. दोन्ही सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढला पाहिजे. मराठा आरक्षणावरून राजकारण करू नये अशी विनंती  देखील त्यांनी कट्ट्याच्या माध्यमातून केली.


मराठा आरक्षणाचा प्रश्न घेऊन पंतप्रधानांना भेटणार का? या प्रश्नाला उत्तर देताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले , मराठा समाजाचा विषय संसदेत मी पहिल्यांदा मांडणारा मी पहिला खासदार आहे. आंदोलन केले आहे. तसेच पंतप्रधानाना भेटण्याचे आवाहन सर्व खासदारांना देखील केले. सर्व पक्षांचे खासदार भेटण्यासाठी देखील तयार होते. परंतु पंतप्रधान कार्यालयने आम्हाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला वेळ दिली नाही. परंतु त्यांनी आम्हाला वेळ देऊन समाजाच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे.



मुख्यमंत्री पदाविषयी ते म्हणाले, लोकशाहीत छत्रपतींचं नाव घेऊन कोणीही काम करू शकते. समाजसेवा करण्यासाठी मुख्यमंत्री पद कशाला हवे. समाजाला दिशा देण्यासाठी काम करणे महत्त्वाचे आहे.


संभाजीराजे म्हणाले की, समाजातील लोक आक्रमक होते, आम्ही तलवार काढलीय, तुम्ही आदेश द्या म्हणत होते, मी म्हणालो तुम्ही काही करू नका, गरज पडली तर मी आहे. समाजाला शांत करण्यासाठी मी तसं बोललो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे.