सातारा : महाराज एकच फक्त छत्रपती शिवाजी महाराज. मला महाराज म्हणू नका, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. साताऱ्यात छत्रपती शिवाजीराजे भोसले संग्रहालयाच्या सुरु असलेल्या बांधकामाची पहाणी करताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


गेल्या कित्येक दिवसांपासून निधीअभावी सातारा एसटी स्टॅन्ड शेजारी बांधकाम सुरु असलेल्या छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पुरातन वास्तूंचं संग्रहालय बांधल जात आहे. हे बांधकाम मध्यंतरीच्या काळात निधीअभावी बंद पडले होते. मात्र ते आद्याप पूर्ण झालेलं नाही. पुरातन खाते आणि पीडब्लूडी विभागाच्या अधिकाऱ्यांना, त्याच बरोबर इतर विभागाच्या प्रमुख लोकांना त्यांनी या ठिकाणी बोलावून घेतले होते.

आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशीर्वादामुळे जगत असल्याचं उदयनराजे म्हणाले.

सातारा मराठा साम्राज्याची राजधानी असून, या ऐतिहासिक संग्रहालयाला पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आणखी दहा कोटींचा निधीही मी मंजूर करुन घेईन. श्रेयवादात मी पडणार नाही, असे उदयनराजे यावेळी म्हणाले.

त्याचसोबत, “देशाला फक्त शिवाजी महाराजांचेच विचार तारतील. शिवाजी महाराजांनी इतक्या कमी कालावधीत साडे तिनशेहून अधिक गडकिल्ले बांधले, ही अशक्य गोष्ट महाराजांनी शक्य केली. त्यामुळे या किल्ल्यांचे जतन केले पाहिजे.”, अशा भावनाही उदयनराजेंनी व्यक्त केल्या.