कोल्हापूर : अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचेच आहेत. त्यांची लवकरच अमेरिकेत जाऊन भेट घेणार आहे, असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

आठवले म्हणाले, "ट्रम्प हे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. त्यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी स्वत: व्हाईट हाऊसला जाणार आहे. येत्या महिनाभरात त्यांची भेट घेणार".

याशिवाय अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यामुळे भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्राचे हितसंबंध अधिक दृढ़ होतील, त्यात अधिक सुधारणा होईल, त्यातून भारताच्या विकासाला अधिक बळ मिळेल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते, तेथील कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांच्या भक्कम पाठिंब्याने  ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण  लवकरच अमेरिकेतील 'व्हाईट  हाऊस'ला भेट देणार असल्याचं आठवले म्हणाले.

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष  सध्या तेथील कष्टकरी  घटकांचे नेतृत्व करीत आहे तसेच भारतात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांनी संकल्पित केलेला रिपब्लिकन पक्ष येथील सर्व समाज घटकांचे प्रतिनिधित्व करीत असतो, असे सांगत अमेरिकेचे  नवनिर्वाचित अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदाची कारकिर्द भारताच्या ही प्रगतिला अनुकूल आहे असे मत आठवले  यांनी व्यक्त केले.