सांगली शहरातील संजयनगरमधील विलास गगणे या कुटुंबाने आपल्या कुत्रा-कुत्रीचं (डॉली आणि टायगर) लग्न धुमधडाक्यात लावून 'त्यांच्यातील प्रेमाचे दर्शन घडवलं. या लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा सध्या सांगलीत आहे. या अनोख्या जोडप्याच्या लग्नात नागरिकांनी व गावकरी उत्साहानं सहभागी झाले होते.संजयनगरमधील आक्काताई गगणे यांच्या डोक्यातून हे भन्नाट आयडिया निघाली. या कुटुंबाने आपल्या कुत्रा-कुत्रीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिलं


गेल्या काही वर्षांपासून गगणे यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या जातीचे श्वान पाळले जातात. त्यापैकी टायगर आणि डॉली हे लग्नाच्या वयात आलेत म्हणून गगणे कुटुंबीयांनी चक्क त्यांचं लग्नच लावून दिलं. आणि हा विवाह सोहळा त्यांनी थाटामाटात पार पाडला आहे. एखाद्या सामान्य कुटुंबातल्या वधू-वराच्या लग्न सोहळ्याप्रमाणे, सर्व आयोजन करण्यात आलं होतं. लग्न मंडप, वधू असलेल्या डॉलीचं चारचाकी गाडीतून लग्नमंडपात आगमन, संगीतच्या ठेक्यावर नाचणारी वऱ्हाडी मंडळी, विधिवत पूजा,रुखवत, आहेर-माहेर, सश्रू नयनांनी वधूची बिदाई आणि जेवणाच्या पंगती असा छोटेखानी डामडौल चि.सौ.कां.डॉली आणि चि.टायगरच्या लग्नासाठी आयोजित करण्यात आला होता. या अनोख्या लग्नसोहळ्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिक व बच्चे कंपनी मोठ्या संख्येने हजर होते.


या वर-वधूच्या कुटुंबियांनी गुरुवारी साखरपुडाही थाटात केला होता. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी तर आनंदाला उधाणच आलं होतं. फुलांनी सजवलेल्या कारमधून डॉलीला टायगरच्या घरी नेण्यात आलं. या वरातीत गावकरी संगीताच्या तालावर नाचत होते. यावेळी मंडपात जेवणाची जोरदार तयारी सुरू होती. वधूच्या कुटुंबियांनी वरपक्षाचं दणक्यात स्वागत केलं. डॉलीला लाल रंगाची साडी नेसवण्यात आली होती. मोजके विधी केल्यानंतर या दोघांनी एकमेकांना हार घातले आणि विवाह संपन्न झाला. त्यानंतर बँडबाजाच्या तालावर टायगर डॉलीची वरात निघाली. या लग्नाची चर्चा आसपासच्या गावांमध्येही सुरू आहे.