गडचिरोली : कुत्र्याच्या प्रामाणिकपणाचे अनेक उदाहरणं तुम्ही ऐकले असतील. असंच उदाहरण गडचिरोली जिल्ह्यातून समोर आलं आहे. कुत्र्याने दाखवलेल्या खबरदारीमुळे गस्तीवर असलेल्या पोलिसाचे प्राण वाचले. पोलिसाचे प्राण वाचवण्यासाठी या कुत्र्याने आपल्या प्राणाची आहुती दिली.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोऱ्यापासून सहा किमी अंतरावरील मरकेगाव इथे ही घटना घडली. जहाल विषारी साप गस्तीवर असलेल्या पोलीस जवानाच्या अंगावर धावून येत असताना कुत्र्याने त्या सापाला तोंडात पकडलं. यामुळे पोलिसांचे प्राण वाचले. मात्र, कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला.

धानोरा पोलीस ठाण्यातील पोलीस मरकेगाव (तुकुम) परिसरात गस्तीवर गेले. त्यांनी आपल्यासोबत एक कुत्राही नेला होता. हा कुत्रा प्रशिक्षित नव्हता. तो गावात भटकणारा होता. पण, खाकी वर्दीचा लळा लागल्याने तो ठाण्यातच वास्तव्य करायचा. हळूहळू पोलिसांची शिस्त त्याने अंगिकारली आणि तो पोलिसांचा मित्र झाला. त्यामुळे पोलिस गस्तीवर गेले की हा कुत्रादेखील त्यांच्यासोबत जायचा.

हा कुत्रा कालही पोलिसांसोबत गेला. कुत्रा पुढे आणि काही पोलीस मागे असा प्रवास सुरु होता. एवढ्यात त्याला अगदी समोरच मण्यार प्रजातीचा विषारी साप दिसला. साप दिसताच तो थांबला. मात्र, साप पोलिसांना दंश करण्याच्या तयारीत होता. त्यामुळे कुत्र्याला रहावलं नाही आणि त्याने सापाला तोंडात पकडलं.

सापाने त्याच्या गळ्याला विळखा घालून दंश केला. कुत्र्याने कशीबशी आपली सुटका करुन घेतली. मात्र, हळूहळू विषाचा प्रभाव त्याच्या शरीरावर जाणवू लागला. पोलिसांनी आज सकाळी वाहन बोलावून कुत्र्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात भरती केलं. मात्र उपचारादरम्यान त्याने प्राण सोडला. पोलीस जवानांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चा जीव गमवणाऱ्या या कुत्र्यासाठी पोलीसही हळहळले.