सांगली : आयएमए मिरज, सांगली महापालिका आणि आयुष यांच्या संयुक्त विद्यमाने 'डॉक्टर आपल्या दारी' या योजनेअंतर्गत  फिरता तापाचा दवाखाना ही संकल्पना सांगलीत राबवण्यात येत आहे.  या योजनेअंतर्गत डॉक्टर दाट लोकवस्ती असलेल्या भागात जाऊन कॅम्प उभारून  डायबिटीस, हायपर टेंशन असलेल्या लोकांची तपासणी करतायत. याशिवाय खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणे असणारे लोकांची तपासणी केली जातेय. यामुळे जर एखाद्याला जर कोरोनाची लक्षणे आढळली तर त्याचे स्वॅब घेण्याची प्रकिया जलदगतीने होणार आहे. पुढील 10 ते 12 दिवस हा कॅम्प सांगली, मिरज भागातील दाट लोकवस्ती असलेल्या भागात घेतला जाणार आहे.


सांगलीतील कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना, सांगलीकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. नवी मुंबई येथील रहिवासी असलेली एक व्यक्ती वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथे आपल्या मूळ गावी 20 मार्च रोजी आली होती. सदर व्यक्ती रेठरे धरण येथून 10 एप्रिल रोजी मुंबईत परतली आहे. मात्र मुंबईत परतल्यानंतर या व्यक्तीची तब्येत बिघडली. उपचारसाठी या व्यक्तीला मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं. तेथे सदर व्यक्तीची कोविड- 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.



कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अपोलो हॉस्पिटल यांच्याकडून खातरजमा करुन पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य 25 व्यक्तींना मिरज येथे आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी दिली.
सांगली रेड झोनमध्ये?

महाराष्ट्रामधील 15 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यात रेड झोन जारी केला आहे. या रेड झोनमध्ये  सांगली जिल्ह्याचा समावेश केला असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सांगलीत रुग्ण संख्या झपाट्याने कमी करण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झालं आहे. मात्र जिल्ह्यातील सद्य परिस्थिती पाहता जिल्ह्याला रेड झोनमध्ये टाकण्याचे आवश्यक नसल्याचे सांगत काही नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही नागरिकांनी ज्या कोरोनाबधितांच्या संपर्कात जे जे लोक आलेत त्याची तपासणी करून त्याचे रिपोर्ट येत नाही तोवर लॉकडाऊन तंतोतंत पाळला जावा असं मत व्यक्त केलं आहे.

पूर्ण जिल्ह्यात प्रशासनाने अभूतपूर्व काळजी घेऊन इथं कुठंही कोरोनाचा प्रसार होऊ दिला नाही. फक्त इस्लामपूर येथे एकाच घरात रुग्ण आढळून आले तेही बरे होत आहेत. त्यात सरकारने लॉकडाऊन हे 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. तेही योग्य आहे मात्र रेड झोन मधील जिल्ह्यांना 30 एप्रिलनंतर परत लॉकडाऊन दिला गेला तर मात्र अवघड होईल, असं नागरिकांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या