मुंबई: बारावीच्या निकालानंतर अनेक घरात आनंदोत्सव असेल. पण अशीही काही घरं आहेत. जिथे आज शोकाकूल वातावरण आहे. अपयशाने खचलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी आज अख्खा महाराष्ट्र हादरला आहे.

यवतमाळमध्ये 2 विषयात नापास झाल्याच्या नैराश्यातून कोमल चाचणेनं आत्महत्या केली. तर वणीतल्या रागिणी गोडेनं पेपर अवघड गेले म्हणून निकालाआधीच आयुष्य संपवलं. धक्कादायक गोष्ट ही की तिला बारावीत तब्बल 78 टक्के गुण मिळाले आहेत.

पिंपरीमध्ये तर मुलाला अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून एका पित्यानं आत्महत्या केली आहे. तर अकोल्यातल्या पवन गवईनं अपेक्षित गुण मिळाले नाहीत, म्हणून जीवनयात्रा संपवली.

प्रश्न असा आहे की, बारावीची परीक्षा म्हणजेच सर्वस्व आहे का? मुलं कमकुवत का होतात? त्यांच्यावर पालकांच्या अपेक्षांचं ओझं आहे का? की समाजातल्या खोट्या प्रतिष्ठेची ही मुलं शिकार आहेत? दहावी-बारावी परीक्षेतील अपयश हे काही जीवनातील अपयश नाही. त्यामुळे या अपयशानं खचून जाऊ नका. तर पुन्हा एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेऊन स्वत:ला सिद्ध करा.