बारामती : मला भावी मुख्यमंत्री व पवार साहेबांना भावी पंतप्रधान म्हणू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे. कार्यकर्त्यांकडून चांगल्या भावनेतून मला भावी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना भावी पंतप्रधान असा उल्लेख केला जातो. पण हा उल्लेख टाळावा या उल्लेखामुळे मित्रपक्षातल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावू शकतात, असेही अजित पवार म्हणाले.
येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन जमिनीवर पाय ठेवून वाटचाल करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला बहुमत कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही अजित पवारांनी केले. बारामती तालुक्यातील पणदरे येथील एका मंगल कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. हे वाक्य बोलत असताना त्यांची नजर प्रसारमाध्यांच्या कॅमेऱ्याकडे गेली आणि अजित पवार यांनी विषयाला बगल दिली आणि म्हणाले अजित पवार काय बोलतात यावरच मीडियाचे लक्ष असते. अटेंशन, ब्रेकिंग न्यूज, असं वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्याकडे पाहून बोलत त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच दरम्यान खासदारकी हवी होती म्हणून निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शेवटी कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचं सांगत सेना आणि भाजप एकाच माळेचे मणी असल्याचे अजित पवार म्हणाले. सेना भाजपचे नेमके काय चाललंय हेच कळत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
पाच राज्यातील निवडणुकात भाजपचा पराभव झाला आहे. मात्र आता कर्जमाफी देणार असल्याचं सांगून गमावलेला जनाधार मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचीही टीका अजित पवार यांनी केली.
मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका, अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2018 05:02 PM (IST)
कार्यकर्त्यांकडून चांगल्या भावनेतून मला भावी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना भावी पंतप्रधान असा उल्लेख केला जातो. पण हा उल्लेख टाळावा या उल्लेखामुळे मित्रपक्षातल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावू शकतात, असेही अजित पवार म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -