Diwali Firecracker :  परभणी जिल्ह्यातील डीग्रस येथील रहिवासी असलेला साईनाथ घुगे हा मुलगा दिवाळी साजरी करण्यासाठी मामाच्या गावी आला होता परंतु फटाके उडवणे ह्या मुलाला चांगलेच घातक ठरले आहे या मुलाचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाल्याचा डॉक्‍टरांनी साईनाथ च्या नातेवाईकांना सांगितले आहे त्यामुळे फटाके वाजवणे लहान मुलांसाठी किती घातक ठरू शकते हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. 


हिंगोली जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात येणाऱ्या डीग्रस येथील साईनाथ घुगे हा मुलगा आईसह दीपावली साजरी करण्यासाठी मामाच्या गावी म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील  गोजेगाव येथे आला. दिवाळी म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक सर्वात महत्त्वाचा सण गोडधोड खाणे कपडे नातेवाईक एकमेकांना भेटतात त्याचबरोबर दिव्यांनी प्रकाशमान करणारा हा सण त्याच बरोबर मुलांसाठी जणू मौजमजेची पर्वणीच असलेला हा सण या सणात लहान मुले मोठ्या प्रमाणात फटाके वाजवत असतात. फटाक्या संदर्भात अगोदरच प्रशासनाच्या वतीने ही वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत योग्य ती खबरदारी घ्या आणि फटाके वाजवत असताना लहान मुलांपासून दूर ठेवा लहान मुलांच्या हातात फटाके देऊ नका अशा सूचना प्रशासनाच्या वतीने वारंवार केल्या जात असतात परंतु यासंदर्भात म्हणावी ती ग्रामीण भागात जनजागृती झाली नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे. 


 गोजेगाव या ठिकाणी दिवाळी साजरी करायला आलेल्या साईनाथ घुगे हा मुलगा घरून खाऊसाठी घेतलेले पैसे फटाके खरेदी करण्यात खर्च करत असे त्या पद्धतीने या मुलाने दिनांक 28 ऑक्टोबर या दिवशी सुद्धा पैसे घेऊन फटाक्यांची खरेदी केली आणि आनंद साजरा करण्यासाठी दिपवाळी अगोदरच फटाके वाजवायला सुरुवात केली. या फटाक्यांमध्ये एका फटाक्याचा आवाज आला नाही हे पाहण्यासाठी साईनाथ फटाक्याच्या जवळ गेला, आणि त्याच क्षणी तो फटाका कुठून साईनाथच्या डोळ्यांमध्ये शिरला या फटाक्याचा आघात झाला.  साईनाथ रक्तभंबाळ जमिनीवर कोसळला हे लक्षात येताच  घरातील नातेवाईकांनी साईनाथ  रुग्णालयात हलवण्यासाठी गाडीत बसवले आणि थेट नांदेड येथील एका रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी साईनाथचा एक डोळा निकामी झाल्याचं सांगितलं. हे कळताच मात्र नातेवाईकांच्या छातीचा ठोका चुकला कारण अवघ्या नऊ वर्षाच्या मुलाला एका डोळ्याने काहीही दिसणार नव्हतं. हे त्यांना स्पष्ट झालं. साईनाथ च्या डोळ्यातून रक्तस्त्राव मात्र सुरूच होता तो रक्तस्त्राव थांबविण्यासाठी सर्जरी करणं अत्यावश्यक होतं आणि त्यासाठी नांदेड येथे व्यवस्था नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने हैदराबाद येथील नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी दोन दिवस उपचार करून यशस्वीरित्या सर्जरी करण्यात आली आहे आता साईनाथ ची प्रकृती हे जरी ठीक असली तरी त्याला आयुष्यभर एका डोळ्याने दिसणार नाही हे मात्र स्पष्ट झाले आहे.  


दिवाळी हा सण प्रत्येकाचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी येत असतो परंतु हा सण साईनाथ ला पुढील आयुष्य अंधकार जगामध्ये टाकणारे ठरले हे लक्षात येताच साईनाथ ची आई खूप  रडत होती. स्वतःच्या नऊ वर्षाच्या चिमुकल्याला आजपासून एका डोळ्याने दिसणार नाही. पुढील आयुष्य कसं असणार याचाच विचार करून त्या माऊलीच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात. या घटनेवर साईनाथच्या नातेवाईकांनी सुद्धा अत्यंत दुःख व्यक्त केले आहे ही घटना आमच्या घरी घडली आहे. परंतु ही घटना अन्य कुणाच्याही घरी घडू नये प्रशासनाने फटाक्यांवर निर्बंध घालावे सर्व नागरिकांनी हे फटाके फोडताना काळजी घ्यावी. लहान मुलांच्या हातात फटाके देण्यात येऊ नये जी वेळ आमच्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये, असे आव्हान साईनाथ च्या नातेवाईकांच्या वतीने करण्यात आले आहे. साईनाथ ची प्रकृती सध्या स्थिर आहे. लवकरच त्याला डॉक्टरांच्या वतीने घरी जाण्यासाठी सुट्टी सुद्धा दिली जाणार असल्याची माहिती साईनाथ च्या नातेवाइकांनी दिली आहे.


दीवाळीचा सण म्हटलं की गोड पदार्थांसोबत फटाके फोडले जातात. बच्चे कंपनी तर दिवसभर फटाके फोडून हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात.  मात्र, फटाके फोडताना थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर फटाका हा आपल्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या मुलांची काळजी घ्या मुलांच्या हातात फटाके देऊ नका मुलांकडे लक्ष द्या आणि खबरदारी घ्या, असे अवाहन 'एबीपी माझा'च्या वतीने सुद्धा करण्यात येत आहे.