Diwali 2022 : आज दिवाळी (Diwali) पहिला दिवस आहे. हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. मनसेच्या (MNS) वतीनं आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राज्यातील दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. मनसेच्या दीपोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार आहेत.
  
दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दिवाळीच्या निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.  मनसेच्या वतीनं शिवाजी पार्कवर दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. याचा शुभारंभ आज (21 ऑक्टोबरला) होणार आहे. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित असतात. यंदा मात्र, दिग्गज नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.


या कार्यक्रमाकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष


राज ठाकरेंच्या मनसेच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्यानं राजकीय वर्तुळाचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमाला मुंबईतील सर्व विभाग अध्यक्ष तसेच शाखा अध्यक्ष, महिला-पुरुष पदाधिकारी यांनी या दीपोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.


आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस


आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यावर्षी दिवळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं. अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते. आनंदाचा, उत्साहाचा, मांगल्याचा सण म्हणजे दिवाळी  (Diwali). दरवर्षी सर्वजण अतुरतेनं दिवाळी सणाची वाट पाहत असतात. आज (21 ऑक्टोबर) दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे. दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. तिच्‍याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस (Vasubaras) या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते.