केंद्र शासनाने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर नागरिकांना नोटा बदलून घेणे किंवा बँक खात्यात जमा करणे यासाठी 30 डिसेंबर 2016 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशा नोटा जमा करण्याच्या बॅंकांच्या यादीत आता राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचाही समावेश करण्यात आला असून, आता या बॅंकामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये नोटा बदलून देण्याची कार्यवाही करता येणार नाही. यासंदर्भात केंद्रीय वित्त विभागाने शुद्धीपत्रक काढले आहे.
भारतीय रिझर्व बॅंकेच्या 8 नोव्हेंबरच्या परिपत्रकात नोटा बदलू शकतील अशा बॅंकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅंकांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकाचा समावेश करण्यात आलेला नव्हता. या परिपत्रकामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा समावेश करून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वित्त विभागाने 9 नोव्हेंबर 2016 रोजी शुध्दीपत्रक काढले आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये या नोटा फक्त स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे.