मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीशी अश्लील संभाषण केल्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. स्वत: जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत.
ही घटना कानावर पडताच, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी पोलीस अधीक्षकांशी संपर्क करुन तत्काळ आरोपींच्या अटकेसाठी कारवाई करण्यास सांगितले. या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली असून, बँक व्यवस्थापक फरार असल्याने त्याच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
या बँक व्यवस्थापकाविरुद्धचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून तयार केला जात आहे. त्याच्या निलंबनासाठीही बँक व्यवस्थापनाकडे प्रस्ताव पाठवला जात आहे. असे प्रकार जिल्हा प्रशासन खपवून घेणार नाही आणि त्याच्याविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई होईल, असं जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी स्पष्ट केलं.
काय आहे प्रकरण?
पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, शेतकरी आणि त्याची पत्नी पीककर्जासाठी दाताळातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. तिथं बँक मॅनेजरने कागदपत्रांची चाळणी करुन तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली. त्यावर संबंधित शेतकऱ्यानं त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. नंतर मॅनेजरने शेतकरी पत्नीसोबत अश्लील संभाषण करत त्यांना शरीरसुखाची मागणी केली.
मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळं पॅकेजही देण्यात येईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठवला. याप्रकरणी मॅनेजर आणि शिपाई या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी प्रकरण, प्रशासनाकडून गंभीर दखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2018 10:05 PM (IST)
ही घटना कानावर पडताच, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी पोलिस अधीक्षकांशी संपर्क करुन तत्काळ आरोपींच्या अटकेसाठी कारवाई करण्यास सांगितल्याची माहिती देण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -