सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सांगलीत भाजपच्या एका इच्छुक उमेदवाराकडून शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांच्या घरासमोर सुयोग सुतार यांनी शस्त्रांसह जाऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.


चांदणी चौक येथील सूर्यवंशी यांच्या घरासमोर हातात सत्तार घेऊन सुतार यांनी सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सुतार यांच्यासह पाच जणांनी यावेळी हल्ल्याचा प्रयत्न केला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

गेल्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून सुतार यांनी निवडणुक लढवली होती. यात दिग्विजय सूर्यवंशी यांनी सुतार यांचा पराभव केला. याचाच राग मनात धरून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करत दिग्विजय सूर्यवंशी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुतार यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

सुतार यांच्या हल्ल्याचा सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध नोंदवण्यात आला. ''सुयोग सुतार हे गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती असून त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत आणि अशा व्यक्तींना भाजप या निवडणुकीत उमेदवारी देऊन शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे खपवून घेणार नाही,'' असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कमलाकर पाटील आणि संजय बजाज यांनी दिला.

''सुयोग सुतार यांच्या गुंडगिरीचा पोलिसांनी बंदोबस्त करत सुतार यांच्यावर कडक कारवाई करावी,'' अशी मागणी यावेळी दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली.

दरम्यान, सुयोग सुतार भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांचा पक्षाशी संबंध आहे किंवा नाही याबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.