रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे रूग्ण आढळून आल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. सद्यस्थितीत जिल्हा चौथ्या टप्पात असून शनिवार अर्थात 19 जूनच्या आकडेवारीनुसार जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर हा 16.35 टक्के आहे. तर, डेथ रेट 3.42 टक्के आहे. सध्या राज्यांच्या इतर भागांच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये आता 'डेल्टा व्हेरियंट'चे रूग्ण आढळून आल्याचं बोललं जात आहे.
याबाबत आम्ही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याशी संपर्क साधला. यावेळी बोलताना 'अद्याप याबाबत कोणतीही माहिती आम्हाला अधिकृत मिळालेली नाही. त्यामुळे यावर आताच काही बोलणं योग्य होणार नाही' अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी 'रुग्णांचे नुमने आम्ही तपासणीसाठी दिल्लीला पाठवले आहे. काही दिवसांमध्ये त्याचे रिपोर्ट आम्हाला प्राप्त होतील. त्यानंतरच यावर बोलणे योग्य होईल. आताच्या घडीला आम्हाला तरी अद्याप काहीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. सध्या कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन कायम आहे' अशी प्रतिक्रिया दिली.
सध्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती काय आहे?
काही निर्बंधांसह जिल्ह्यात जनजीवन सुरू आहे. आरोग्य विभाग नागरिकांच्या चाचण्या करण्यावर भर देत आहे. शनिवारी जिल्ह्यात 251 नव्या रूग्णांची भर पडली. तर यापूर्वीचे आणि शनिवारचे असे पकडून 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतार्यंत 47,451 जणांना कोरोनाची लागण झाली असून 40,390 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रूग्ण बरे होण्याचं प्रमाण 85.11 टक्के आहे. आतापर्यंत 1623 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लहान मुलांसाठी स्पेशल वॉर्ड
तिसऱ्या लाटेची शक्यता आणि यावेळी लहान मुलांना संभाव्य धोका पाहता आता जिल्हा आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यामुळे उद्यमनगर येथील महिला रूग्णालयात एका वेगळ्या कोविड वॉर्डची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वसुविाधांनी युक्त 14 बेड्स असून या ठिकाणच्या भिंतीवर विविध प्रकारचे फुले, फळे, प्राणी, झाडं आणि काटूर्न यांची चित्र रेखाटली गेली आहेत. इथं आलेल्या मुलांवर कोणतंही दडपण येऊ नये. त्याचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं. जेणेकरून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळेल आणि बाळ लवकर बरे होईल. तशा प्रकारचे वातावरण निर्माण होण्यासाठी हे सारं केलं गेल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. यावेळी संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लढण्यासाठी आम्ही तयार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला.