रत्नागिरी : 'चाकरमान्यांनू तुम्ही आमचे आहात. आम्हाला तुमची आमच्यापेक्षा देखील जास्त काळजी आहे' हे अनेकांनी आपल्यापरीने मांडण्याचा प्रयत्न देखील केला. आता कोकणातून तब्बल 3 टन धान्य मुंबईकरता रवाना करत त्याचे वाटप घरोघरी करण्यात आले आहे. याकरता राजापूर तालुक्यातील ओणी- कोंडीवळे गावच्या नागरिकांनी पुढाकार घेत 2 टन तांदूळ आणि 1 टन डाळ गोळा केली. दोन्ही गावांमधील मुंबईत वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर मुंबईतील प्रत्येक कुटुंबामध्ये 5 किलो धान्याचे वाटप करण्यात आले. सध्या गावकऱ्यांनी केलेल्या या कृतीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

कोकणातल्या प्रत्येक घरातील किमान एक तरी माणूस हा नोकरी-धंद्यानिमित्त मुंबईत राहतो. कामानिमित्त ही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जवळपास 70 टक्के लोक आज आपले कोकणातील मूळ गाव सोडून मुंबई, पुणे किंवा इतर शहरांमध्ये स्थायिक किंवा वास्तव्य करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढला आणि कोकणवासिय धास्तावले. अनेकांनी तर आमच्या चाकरमान्यांना गावी आणा, त्यांना तशी परवानगी द्या अशी मागणी केली होती. एरवी एप्रिल- मे महिन्यात चाकरमान्यांच्या आगमनाने गजबजणारे गाव शांत दिसू लागले. नाक्या-नाक्यावर आणि पारांवरून चाकरमान्यांच्या, मुंबईच्या परिस्थितीबाबत चर्चा सुरू झाली. काहींनी तर छुप्या पद्धतीनं गाव जवळ करण्याचा प्रयत्न केला. काहींना त्यात यश आले तर काहींची चोरी पकडली गेली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गावकऱ्यांनी गावच्या सीमा बंद केल्या. त्यावरून देखील संमिश्र प्रतिक्रिया पुढे आल्या.

आमदारांच्या मदतीनं काढला समस्येवर तोडगा 

दरम्यान, अन्नधान्य गोळा झाल्यानंतर गावकऱ्यांसमोर वाहन परवानगीचा प्रश्न उभा राहिला. यावेळी स्थानिक शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या पुढाकारानं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. सारी परिस्थिती जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी देखील वाहनाला परवानगी दिली. त्यामुळे मुंबईतील प्रत्येकाच्या घरी हे धान्य पोहोचवणे शक्य झाले.

प्रत्येकाला चाकरमान्यांची काळजी

मुंबईतील सध्याची कोरोनाची स्थिती पाहता प्रत्येकाला आता चाकरमान्यांची काळजी वाटू लागली आहे. चाळी आणि झोपडपट्टींमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वस्ती असल्याने चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. 'देवा म्हाराजा आमच्या चाकरमान्यांचे रक्षण कर' असं गाऱ्हाणं सध्या कोकणी माणूस आपल्या ग्रामदेवतेला घालत आहे.