नागपूर : नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातील आमदारांनी टार्गेट करत गृहविभागावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांच्या बारमधील तोडफोड प्रकरणात पोलिसांनी अतिरंजित कारवाई केल्याचे आरोप भाजप आमदारांनी केले आहेत.


भाजपच्या सहा आमदारांनी पत्रकार परिषद घेत नागपूर पोलिसांच्या निष्पक्षपातीपणावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे.


आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेल नाहीत, पण पोलिसांनी अतिरंजित कारवाई केल्याचा आरोप केला आहे. त्यावर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केले आहेत.

20 नोव्हेंबरच्या मध्यरात्री क्लाऊड सेव्हन बारमध्ये आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष आणि त्याच्या मित्रांनी बारमालकासोबत वाद घालत तोडफोड केली होती. या घटनेच्या काही वेळानंतर खोपडे यांच्या मुलांचा मित्र शुभम महाकाळकरची हत्या झाली. मात्र पोलिसांनी खोपडे यांच्या दोन्ही मुलांसह त्यांच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली होती.