नागपूर: नागपुरातील महानगरपालिकेची शहर बस सेवा म्हणजेच 'आपली बस' ही आज चौथ्या दिवशीही बंद आहे. महापालिकेने आपली बस सेवा पुरवणाऱ्या तिन्ही कंत्राटदारांचे पैसे थकवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही कंत्राटदारांचे एकूण 45 कोटी रुपये महापालिकेने दिलेले नाहीत.


जोवर महापालिकेकडून थकीत पैसे मिळणार नाहीत, तोवर बस सेवा सुरु करणार नाही, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतल्यामुळे शहरातील बस सेवा ठप्प झाली आहे.

शनिवार आणि रविवारी अनेक शाळा महाविद्यालयं बंद असल्याने बस सेवा बंद असल्याचे फारसे परिणाम झाले नाहीत. मात्र, कालपासून नागपूरकर त्रास सहन करत आहेत.

आज सकाळपासूनच एकही ‘आपली बस’ रस्त्यावर धावत नाही. सर्व डेपोमध्ये बस उभ्या आहेत. तर शहरातील सर्वात महत्वाचे सीताबर्डी बस टर्मिनल ओस पडले आहे.

“आम्ही कंत्राटदारांसोबत चर्चा करत आहोत”, इतकंच उत्तर देऊन नागपूर महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपचे नेते गप्प आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये हा गुंता न सुटल्यामुळे नागपूरकर त्रस्त आहेत.