Sangli News : सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीच्या माळरानावरील यशवंत साखर कारखान्याच्या (Yashwant Sugar Factory) मालकीवरून भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांच्यामध्ये पुन्हा वाकयुद्ध रंगलं आहे. यामध्ये खासदार आणि आमदार यांनी एकमेकांना आव्हान, प्रतिआव्हान देत एकमेकांविरुद्ध टिकेची झोड उठवली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून नागेवाडीतील यशवंत कारखान्याच्या मालकीहक्कावरून खासदार, आमदार यांच्यात संघर्ष सुरु आहे. न्यायालयीन लढाई चालू असताना आमदार बाबर यांच्याकडून कुरघोड्या केल्या जात आहेत. त्यामुळे कारखाना आर्थिक संकटांना सामोरं जात असल्याचा आरोप करीत खासदार पाटील यांनी या कुरघोड्या थांबवल्या नाहीत तर, आपणास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अनिल बाबर यांना दिला आहे. या आरोपांना अनिल बाबर यांनी लगेच उत्तर देत हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी आपली न्यायालयीन लढाई सुरू आहे. पण खासदारांच्या तोंडी दमबाजीची भाषा शोभत नाही. जर तासगावला बोलावलं तरी आपण एकटे यायला तयार आहे. गेली चाळीस वर्षे संघर्षच करीत आलो असल्यानं, अशा दमबाजीला आपण घाबरत नाही, असे म्हणत आमदार अनिल बाबर यांनी खासदारांना आव्हान दिलं आहे. 


कारखान्याच्या बाबतीत बाबर कुरघोड्या करतात; खासदार संजय पाटलांचा आरोप 


नागेवाडी येथील यशवंत साखर कारखान्याच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या खासदार संजय पाटील (Sanjay Ramchandra Patil) यांनी आमदार अनिल बाबर यांना लक्ष्य केलं आहे. यशवंत कारखान्याच्याबाबतीत निकाल लागल्यानंतर अजून कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  "2012-13 साली जिल्हा बँकेनं यशवंत कारखाना विक्रीस काढल्यावर आपण टेंडरच्या माध्यमातून त्यावेळच्या ऑफसेट प्राईसपेक्षा 28 कोटी रूपये जास्त देवून यशवंत कारखाना घेतला होता. त्याच्यानंतर सेल सर्टिफिकेट आणि पझेशन दिलं. त्यानंतर अनिलभाऊंनी कोर्ट मॅटर सुरु केलं. गेल्या नऊ वर्षांमध्ये कोर्ट प्रकियेमुळे मला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. परंतु मी कधीही व्यक्तिगत टीका, टिप्पणी केलेली नाही. माझी कायदेशीर लढाई सुरु होती. त्यामुळे कायदेशीर लढाईला सामोरे जात होतो. नुकताच पंधरा दिवसांपुर्वी कारखान्याच्याबाबतीत निकाल लागला आहे. यशवंत कारखाना कुणी बंद पाडला, त्याच्यामध्ये काय घोटाळे झाले? त्याला जबाबदार कोण? यावर खोलात जाऊन योग्यवेळी लोकांसमोर बोलेन.", असं संजय पाटील म्हणाले. 



"लागलेल्या निकालाच्या आधारे कारखाना मी खरेदी केलेला आहे. तुम्ही त्याच्याविरूध्द कोर्टात गेलेले आहात. हायकोर्ट त्याबाबत निर्णय देईल. आपण काही करायचं नाही आणि दुसर्‍याला काही करून द्यायचं नाही, ही भूमिका आता सोडा. मी शेतकर्‍यांसाठी, सभासदांसाठी करणार आहे, हे लोकांपुढे सांगायचा खोटं नाटक बंद करा, निकालामुळे तुमचं पितळ उघड झालं आहे.", असे म्हणत खासदार संजय पाटील यांनी कारखान्याच्या झालेल्या अवस्थेवरून अनिल बाबर याना लक्ष्य केलं.


आमदार अनिल बाबर यांचा खासदारांवर पलटवार


खासदार संजय पाटील यांच्या या आरोपाला आमदार अनिल बाबर यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. "यशवंत कारखान्याचा निकाल तुमच्या बाजूने लागला असेल, तर आनंद व्यक्त करण्याऐवजी तुम्ही संताप का व्यक्त करीत आहात? दमदाटीची भाषा कशाला करता, ते दिवस आता संपले आहेत. त्यामुळे असली भाषा कोणीच करू नये आणि तुम्ही तर लोकसभा सदस्य आहात तुम्हाला हे शोभतच नाही. मुंगीही हत्तीला भारी पडू शकते अशा शेलक्या शब्दांत आमदार अनिलभाऊ बाबर यांनी खासदार संजयकाका पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यशवंत कारखान्याची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. कर्ज थकल्यामुळे यशवंत कारखाना बँकेने विक्रीस काढला. कारखाना विक्रीला माझी संमती नव्हती. विक्रीवेळी मी संचालक होतो. मी जिल्हा बँकेला कारखान्याची विक्री नव्हे तर पुर्नवसन करून द्या, असं म्हणून प्रयत्न करत होतो. पण तसे झाले नाही." , असं ते म्हणाले. 


"काही राजकीय कारणांमुळे कारखान्याचे पुर्नवसन होऊ दिलं नाही. यशवंत सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, यासाठी माझी लढाई आहे. यामध्ये काय गैर आहे? माझ्यात ताकद असेपर्यंत ही लढाई मी लढतच राहणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढण्याची माझी तयारी आहे. यशवंत कारखान्याच्या लढाईत वेळोवेळी ज्याठिकाणी भूमिका घेणे आवश्यक आहे, तिथे आम्ही भूमिका घेतली आहे. आताही आम्ही उच्च न्यायालयात गेलो आहोत. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. त्यामुळे कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा, यासाठी मी शेवटपर्यंत ताकदीनिशी लढणार आहे.", असं अनिल बाबर यांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह